काही सुखद; बाधितांपेक्षा दुपटीने झाले कोरोनामुक्त

केवल जीवनतारे
Sunday, 4 October 2020

आज नव्याने कोरोनाची लागण झालेल्या ८७६ बाधितांपैकी ६६४ जण शहरातील आहेत. तर २११ जण ग्रामीण भागातील आहेत. विशेष असे की, सर्वाधिक रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेडिकलमध्ये शनिवारी अवघे १४ जण कोरोनाबाधित आढळले. एम्समध्ये ३८ तर माफसूमध्ये १९ आणि निरी प्रयोगशाळेत ४७ जण बाधित आढळले आहेत.

नागपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सलग हजाराच्या खाली कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. तीन दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शनिवारी ८७६ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. मात्र, दुपटीपेक्षाही अधिक संख्येने १,८२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे कोरोनामुक्तांचा टक्का ८३ वर पोहोचला आहे. तर मृत्यूमध्येही घट झाली आहे.

शनिवारी २२ मृत्यूची भर पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत २५९६ कोरोनाचे मृत्यू नोंदवले आहेत. तर बाधितांची संख्या ८० हजार ८४४ वर पोहचली आहे. नागपूर जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या तीन दिवसांत २ हजार ८३२ कोरोनाबाधित आढळून आले तर ४ हजार ५३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा टक्का चांगलाच वाढला आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनातून बरे होणाऱ्यांचा टक्का ४६ वर घसरला होता. परंतु ऑक्टोबरमध्ये यातही दुपटीने टक्का वाढला आहे.

अधिक वाचा - बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा

स्थानिक प्रशासनासाठी ही दिलासादायक बाब आहे. सप्टेंबरच्या पहिल्या तीन दिवसांत १३२ मृत्यू झाले आहेत. तर ऑक्टोबरच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये ९६ मृत्यू झाले आहेत. यामुळे मृत्यूमध्येही घट झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या बऱ्यापैकी होत आहे. शनिवारी साडेपाच हजार चाचण्या नागपुरातील सात प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत. यापैकी ८७६ जण कोरोनोबाधित आढळले असून नेहमीप्रमाणे सर्वाधिक ११८० चाचण्या खासगी प्रयोगशाळेत झाल्या असून ४०० बाधित आढळले आहेत.

जिल्ह्यात मागील सहा महिन्यात ४ लाख ६९ हजार ३३६ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून यातील ८० हजार ८४४ जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले. यापैकी २५९६ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. आज नव्याने कोरोनाची लागण झालेल्या ८७६ बाधितांपैकी ६६४ जण शहरातील आहेत. तर २११ जण ग्रामीण भागातील आहेत. विशेष असे की, सर्वाधिक रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेडिकलमध्ये शनिवारी अवघे १४ जण कोरोनाबाधित आढळले. एम्समध्ये ३८ तर माफसूमध्ये १९ आणि निरी प्रयोगशाळेत ४७ जण बाधित आढळले आहेत.

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

मेयो रुग्णालयात १३१ जणांना बाधा झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले. तर दगावलेल्या २२ जणांमध्येही १७ जण शहरातील आहेत. ४ जण गावखेड्यातील तर एक जण जिल्ह्याबाहेरचा व्यक्ती आहे. शनिवारी मेडिकलमध्ये ६ तर मेयोत ७जण दगावले आहेत. उर्वरित ९ जण खासगी रुग्णालयात दगावले आहेत. १८२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे कोरोनामुक्त झालेल्याचा आकडा ६६९९८ वर पोहोचला आहे.

दाखल रुग्णांची संख्येत घट

मेयो मेडिकलसह खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्येत चार दिवसांमध्ये अडीच हजारांनी घट झाली आहे. १५ हजारावर सक्रिय रुग्णांची संख्या होती. परंतु शनिवारी ११ हजार २५० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. यापैकी ३ हजार १६४ रुग्ण मेयो, मेडिकलसह खासगी कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील ७ हजार ८८४ शहरातील तर ३ हजार ३६६ ग्रामीण भागातील कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून कळविण्यात आली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twice as many become corona-free than those affected