नागपुरात भररस्त्यात चाकूहल्ला, आरोपींना अटक

अनिल कांबळे
Wednesday, 21 October 2020

अल्पवयीन आरोपीने खिशातून चाकू काढून राजू यांच्या छातीत मारला. यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर दोन्ही आरोपी तेथून दुचाकीने पसार झाले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिस आरोपींच्या शोधात पॅट्रोलिंग करीत होते.

नागपूर : क्षुल्लक कारणावरून खून करणाऱ्या दोन आरोपींना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या आरोपींना पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली. शुभम वंजारी, असे आरोपीचे नाव आहे, तर राजू रंभाड, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - खंडाळा-येलदरी घाटात ट्रॅव्हल्स उलटली; दोन ठार, 19 प्रवासी जखमी

सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास राजू रंभाड आणि त्यांचा पुतण्या अमिष हे दोघेही मोटारसायकलने झेंडा चौकातील आटाचक्कीत दळण ठेवण्यासाठी गेले होते. राजू यांनी आटाचक्कीत दळण ठेवल्यानंतर ते झेंडा चौकातील ध्वजस्तंभाजवळ बसलेले संदीप पाटील यांच्याकडे खर्रा मागायला गेले. त्याचवेळी त्या ठिकाणाहून एक अनोळखी दुचाकीचालक जात होता. त्याने रस्त्यात थांबून राजू यांना पत्ता विचारला असता ते त्यांना पत्ता सांगत असताना त्याच परिसरातील आखाड्यासमोर राहणारा अल्पवयीन आरोपी व शुभम हे स्कूटीवरून आले. त्याने राजू यांना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले असता राजू हे बाजूला झाले. त्यावेळी त्यांनी राजू यांना गाडीने कट मारला असता राजू त्याच्यावर जोरात ओरडले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून राजूसोबत वाद घातला. अल्पवयीन आरोपीने खिशातून चाकू काढून राजू यांच्या छातीत मारला. यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर दोन्ही आरोपी तेथून दुचाकीने पसार झाले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिस आरोपींच्या शोधात पॅट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, दोघेही आरोपी बिनाकी जोशीपुरा भागातील आहेत. या माहितीवरून आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास साहाय्यक निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे करीत आहेत. ही कारवाई उपायुक्त नीलोत्पल, साहाय्यक आयुक्त पुरुषोत्तम कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ निरीक्षक रमाकांत दुर्गे व पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested in case of knife attack in nagpur