संधी मिळताच मेडिकलमधून पळाले दोन कोरोना रुग्ण अन्‌ उडाला गोंधळ, वाचा काय झाले ते... 

Two Corona's patients Ran away from medical Hospital
Two Corona's patients Ran away from medical Hospital

नागपूर : पाचपावली विलगीकरण केंद्रातून एका कोरोनाबाधिताने मी रुग्णवाहिकेत बसतो असे सांगत पळ काढल्याची ताजी घटना असतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) रविवारी उशिरा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये मिसळून दोन कोरोनाबाधित पळून गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे मेडिकल प्रशासनात एकच खळबळ उडाली. 

मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले दोन कोरोना रुग्ण रविवारी बऱ्या झालेल्या रुग्णांशी संवाद साधत होते. संवाद साधत असताना कोरोनामुक्त रुग्ण घरी जाण्याच्या तयारीत होते. ते हॉस्पिटलमधून बाहेर पोर्चमध्ये आले. या रुग्णांच्या मागे मागे येत पुढे या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हे दोघे कोरोनाबाधित शिताफीने सहभागी झाले. आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी पळ काढला. 

काही वेळाने हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला. परंतु, बराच उशीर झाला होता. पोलिसांच्या मदतीने शोधाशोध सुरू झाली. मात्र, पोलिसांना पीपीई किट नसल्याने मास्क लावून शोधाशोध सुरू केली. दोघांपैकी एक कोरोनाबाधित परतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, कोंढाळीतील 56 वर्षीय बाधिताचा अद्याप पत्ता लागला नाही. यामुळे पोलिसांनी कोंढाळीला संदेश जारी केला आहे. दरम्यान, ही माहिती रुग्णाच्या घरी तसेच गावातील आजूबाजूच्या व्यक्तींना कळली. यामुळे कोंढाळीत भीतीचे वातावरण आहे. 

कोरोना विषाणूचा प्रकोपाचे गंभीर परिणाम उपराजधानीत दिसू लागले आहेत. 5 जुलैपासून सुरू झालेले मृत्यूचे सत्र थांबले नाही. सोमवारी मेडिकलमध्ये मध्यरात्री दाखल झालेला 51 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. जुलै महिन्याच्या तेरा दिवसात 12 जण दगावले आहेत. यामुळे मृत्यूचा आकडा 37 वर पोहचला. दर दिवसाला होणाऱ्या कोरोनाच्या मृत्यूमुळे प्रशासन हादरले आहे. त्यातच दिवसभरात आणखी 74 जण कोरोनाबाधित आढळून आले. उपराजधानीत बाधितांची संख्या 2357 झाली आहे. तर 1545 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

सोमवारी मृत्यू झालेला व्यक्ती रामेश्‍वरी येथील रहिवासी आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजून 43 मिनिटांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, कोरोनाची लक्षणे असल्याने कोविड चाचणी केली. सकाळी 11वाजून 30 मिनिटांनी त्यांना मेडिकलमधील डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. वनविभागाच्या प्रधानमुख्य वनसंरक्षक कार्यालयात लेखापाल म्हणून कार्यरत होते. 24 जून रोजी कार्यालयात हजर होते. परंतु त्यानंतर त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला. यामुळे ते रजेवर गेले. 

किडनी निकामी झाल्याने ते डायलिसिसवर होते. त्यातच त्यांना उच्च रक्तदाब होता. श्‍वसनाचाही त्रास होता. अखेर त्यांचे निधन झाले. मृत्यूनंतर त्यांच्या चाचणीचा अहवाल कोरोना बाधित आला. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांच्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क आलेल्यांची तपासणी केली जाईल. दरम्यान वनविभागातील कर्मचारी धास्तीत आले आहेत. मृत कर्मचाऱ्याशी ज्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात तसेच घरी भेट घेतली होती, अशा कर्मचाऱ्यांनी स्वतःहून चाचणी करून घ्यावी असे आवाहन वन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. शहरात मृत्यूची संख्या हळूहळू वाढत असल्याने भयावह वातावरण निर्माण झाले आहे. 

उपराजधानीत गुणाकार पद्धतीने कोरोना वाढत आहे. झोपडपट्टयांमध्ये आतापर्यंत कोरोनाने 400 जणांना विळख्यात घेतले. नवीन आढळून आलेले कोरोनाबाधित बोरियापुरा, न्यु इंदोरा, काशीनगर, गोकुळपेठ, रामदासपेठ, डिप्टी सिग्नल, जुनी मंगळवारी, शक्तिमातानगर, खाटिकपुरा सदर, रिपब्लिकन नगर, दिघोरी, मिनिमाता नगर, मानकापूर, मानकापुर, टिमकी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती, बंदे नवाजनगर, मध्यवर्ती कारागृह, गणपतीनगर येथील आहेत. 

सारीचे दोन बळी

 
भंडारा येथील 35 वर्षीय तरुण मेडिकलमध्ये पहाटे साडेतीन वाजता दाखल झाला. अवघ्या तीन तासांमध्ये तो युवक दगावला. मात्र, कोरोची शंका असल्याने त्याचे नमुने घेण्यात आले. तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पहाटे सहा वाजता नमुने घेण्यात आल्यानंतरही अद्याप चाचणीचा अहवाल प्राप्त झाला नाही. यामुळे युवकाचा मृतदेह चाचणीच्या प्रतीक्षेत शवविच्छेदन विभागात ठेवण्यात आले आहे. दिवसभरात सारीचे तीन मृत्यू नोंदवण्यात आले. यापैकी एक जण कोरोनाबाधित आढळला. तर दुसऱ्याच्या चाचणीचा अहवाल प्रतीक्षेत आहे. 


संपादित : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com