अरे हे काय... नागपूर विद्यापीठ ‘प्राध्यापक लेस’; तब्बल एवढी पदे रिक्त

मंगेश गोमासे
Sunday, 30 August 2020

विद्यापीठामध्ये ४० विभाग आहेत. या विभागात ३३४ पदांना मंजुरी आहे. मात्र, सध्या केवळ १४० प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा १९४ एवढा आहे. येत्‍या काही महिन्यात काही प्राध्यापक रिक्त होणार आहेत. त्यामुळे यात वाढ होणार आहे.

नागपूर  : गौरवशाली परंपरा असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. शासनाने भरतीप्रक्रिया सुरू न केल्यास विद्यापीठ ‘प्राध्यापक लेस’ तर होणार नाही ना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. येथील अनेक विभागांचा कारभार एका प्राध्यापकाच्या खांद्यावर आहे. त्यामुळे प्रगत महाराष्ट्राच्या कितीही बाता होत असल्या तरी पदभरतीअभावी उच्च शिक्षणाची अधोगती होत असल्याचे हे चित्र आहे.

विद्यापीठामध्ये ४० विभाग आहेत. या विभागात ३३४ पदांना मंजुरी आहे. मात्र, सध्या केवळ १४० प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा १९४ एवढा आहे. येत्‍या काही महिन्यात काही प्राध्यापक रिक्त होणार आहेत. त्यामुळे यात वाढ होणार आहे. एकेकाळी एका विभागात सात ते आठ प्राध्यापक कार्यरत असताना त्याच विभागात आज एका प्राध्यापकाच्या भरवशावर काम सुरू आहे. उर्दू, हिंदी, इंग्रजी, मराठी अशा भाषाशास्त्राच्या विभागांची अवस्था तर फारच दयनीय आहे. काही विभागांना तर नियमित प्राध्यापकच नसल्याने त्याची धुरा हा प्रभारींच्या भरवश्यावर आहे. 

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला
 

वर्षभरापूर्वी विद्यापीठाने ६३ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. यासाठी शासनाने मान्यताही दिली होती. मात्र, अचानक कुठलेही ठोस कारण न देता सरकारने प्राध्यापक भरतीवर बंदी लावली. त्यामुळे ही ६३ पदेही भरता आली नाही. दुसरीकडे जुन्या आराखड्यातील 162 पदांपैकी ९२ पदे भरण्याची परवानगी विद्यापीठाला मिळाली. मात्र, मराठा आणि इतर आरक्षणाबाबत निर्णयच न झाल्याने मागासवर्गीाय विभागाने पदांना मान्यता देण्याचे टाळले होते. यातूनच ९२ पदांची भरतीप्रक्रिया अद्याप राबविण्यात आलेली नाही. 

यासंदर्भात 19 डिसेंबरला पार पडलेल्या बैठकीत सचिवांनी याचा आढावा घेत, त्याबद्दल मागासवर्गीय विभागाला पत्र देण्याचे स्पष्ट केले होते. शिवाय नव्या वाढीव पदांचा पाठविलेल्या प्रस्तावात नव्या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमासाठी आवश्‍यक असलेल्या पदांनाही मान्यता देण्यात येईल, असे सांगितले होते. अद्याप यासंदर्भात कुठलीच कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे याबाबत कुलसचिव डॉ. निरज खटी यांनी वांरवार सचिवांशी चर्चा केली. मात्र, त्याबाबत कुठलीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?
 

२०० कर्मचारी निवृत्त

विद्यापीठातील दोनशे कर्मचारी आतापर्यंत निवृत्त झाले आहेत. मात्र, कर्मचारी भरतीवर बंदी असल्याने याच सेनानिवृत्त कर्मचाऱ्यांना ४६२ रुपये रोजंदारीवर ठेवून काम काढले जात आहे. विद्यापीठात आज ७० सेवानिवृत्त कर्मचारी ४६२ प्रमाणे कामावर आहेत. कर्मचाऱ्यांचा हा बॅकलॉक वाढतच चालल्याने अधिकाऱ्यांना कामे वेळेत कशी करावी, अशी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 

संपादित ः अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vacancies for professors in Nagpur University