पिंपळदरा, रामपुरी येथील मतदार राहणार मतदानापासून वंचित?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

पिंपळदरा व रामपुरी येथील मतदार त्यांच्या पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत. 

जलालखेडा (जि.नागपूर)  :  मंगळवारी (ता. 7) जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होत आहे. मतदारांनी कोणाला मत द्यावे, हे मनोमनी ठरविलेसुद्धा असेल. पण निवडणूक अधिकाऱ्यांना कोणते गाव कोणत्या मतदारसंघात आहे व त्यांचे मतदान केंद्र कुठे असावे याचे साधे भान नसणे, हे गंभीर आहे. यामुळे पिंपळदरा व रामपुरी येथील मतदार त्यांच्या पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत. 

अधिक वाचा  :  अधिकाऱ्यांनो, देता माहिती की भरता दंड? 

निवडणूक अधिक-यांचा घोळ 
नरखेड तालुक्‍यातील पिंपळदरा व रामपुरी हे गाव जिल्हा परिषद सर्कल जलालखेडामध्ये समाविष्ट आहे, तसेच पिंपळदरा हे गाव पंचायत समितीचे सर्कलदेखील जलालखेडामध्ये आहे. पण रामपुरी हे गाव पंचायत समिती सर्कल मेंढलामध्ये आहे. आतापर्यंत पिंपळदरा गावाचे मतदार जि.प.च्या निवडणुकीत त्यांच्या गावात मतदान करीत होते. पण येथील मतदार कमी असल्यामुळे नरखेड येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी या गावाला बानोर चंद्रहास्य या गावाशी जोडून त्यांचे मतदान केंद्र बानोर चंद्रहास्य येथे केले. त्यातच येथे अधिकाऱ्यांची गल्लत झाली. बानोर चंद्रहास्य हे गाव जिल्हा परिषद सर्कल जलालखेडामध्ये येत असले तरी मात्र पंचायत समिती सर्कल मेंढलामध्ये येते. यामुळे पिंपळदरा येथील मतदारांना त्यांच्या उमेदवारांची मतपत्रिका असलेले मतदान यंत्र मिळणार नाही व त्यांना मतदान करण्यापासून ते वंचित ठेवले आहे. तसाच प्रकार रामपुरी येथील मतदारांसोबत झाला आहे. हे उघडकीस आल्यानंतर आता कुठे निवडणूक अधिकारी जागे झाले व आता त्यांनी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. 

अधिक वाचा  :   इथे गुण्यागोविंदाने राहतात "यंग सिनियर्स' 

अन्यथा पुन्हा निवडणूक घ्या ! 
नरखेड तालूक्‍यातील जिल्हा परिषद सर्कल जलालखेडा गट क्र. 3 मधील मतदारांची अदलाबदल झाल्याचे चित्र सायंकाळी सात वाजता उघडकीस आले. निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पिंपळदरा हे गाव मतदानापासून वंचित करण्याचा डाव असल्याचे पिंपळदरा ग्रामवासींचे म्हणणे आहे. ही बाब स्वतः व पिंपळदरा येथील अरविंद बनसोड उपविभागीय अधिकारी व नरखेडचे तहसीलदार यांना कळवली असता त्यांनी चूक मान्य करण्यास नकार देत प्रकरण दाबण्याच्या घडामोडी सुरू केल्या. बानोरचंद्रमधून पिंपळदरा हे गाव वगळून वाढोणा येथील मतदान केंद्रावर हलविण्याच्या रात्री 9 वाजता हालचाली वाढविण्यात आल्या. परंतु मागील जि.प. व पं.स मतदान केंद्र हे पिंपळदरा येथे स्वतंत्र होते होते. यामुळेदेखील पिंपळदरा येथेच मतदान केंद्र देण्यात यावे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार करत निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी पिंपळदरा येथील गावकऱ्यांनी केली आहे. 

अधिक वाचा :  "स्मार्ट' असूनही "तीला' करावी लागते प्रतीक्षा 

अशी काहीही चुक झाली नाही 
असा काहीच प्रकार झाला नाही. पिंपळदरा या गावातील मतदार हे वाढोणा येथील मतदार केंद्रात मतदान करणार असून ते त्यांच्या उमेदवारांना मतदान करू शकणार आहेत. अशी काही चूक झाली नाही. 
हरीश गाडे , तहसीलदार तथा सहायक निवडणूक अधिकारी, नरखेड 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters in Pimpaldara, Rampuri deprived of voting?