काय आहे कवडी आणि तिची किंमत? घ्या जाणून

shell-
shell-

नागपूर : एकेकाळी चलनवलनासह दागिने, देव्हाऱ्यातही आवर्जून असणारी कवडी सध्या दुर्मिळ झाली आहे. पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती. चलन उदयास येण्यापूर्वी सर्व व्यवहार (एक्सचेंज) बार्टरच्या रुपात होते. म्हणजे एखाद्याकडे दोन पोते गहू असतील तर ते देऊन त्याने दुसऱ्याकडचे तांदुळ घेणे म्हणजे वस्तू विनिमय.

पुढे व्यवहारात चलन आले. मुगल काळापासून म्हणजे इ. स. १५२६ ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे १९४७-४८ पर्यंत कवडीचा चलनात उपयोग होत होता. कवडी चलनात आल्यानंतर जनजीवनात इतकी रुळली की त्यावरुन वाक्प्रचार आणि म्हणीही तयार झाल्या. तेव्हापासून अत्यंत कंजुस व्यक्तीला कवडी चुंबक संबोधले जाऊ लागले. सगळ्यात कमी मूल्याचे चलन हे फुटकी कवडी होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै ,ढेला, पैसा, आणा व रुपया अशी चलनाची किंमत वाढत जात होती.

विदर्भात गोंडराजांची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कवड्या आणि चांदी हेच विनिमयाचे साधन होते. गोंड राजवट प्रस्थापित झाली आणि चांद सुलतान यांनी टांकसाळ काढली. नंतर अनेक टांकसाळी अस्तित्वात आल्या. सध्या भारतात मुंबई, अलिपूर(कोलकता), हैद्राबाद आणि नोईडा या ठिकाणी टांकसाळ आहेत. विनिमयाचे साधन म्हणून तेव्हा केवळ नाणेच चलनात होते. त्यावरुन दाम करी काम हा वाक्प्रचार अस्तित्वात आला.

जाणून घ्या कवडीची किंमत
एका चांगल्या कवडीची किंमत तीन फुटक्या कवड्या होती. दहा चांगल्या कवड्यांची किंमत एक दमडी होती. चार दमड्यांची किंमत एक पै, दोन दमड्यांची किंमत एक ढेला, दोन ढेल्यांची किंमत पैसा अशी होती. एक रुपयाची किंमत २५६ दमड्या होती. ‘खिशात फुटकी कवडी नाही’ ही वाक्प्रचार तेव्हापासून रूढ झालेली आहे. या हिशेबानुसार तेव्हा एक रुपयासाठी तब्बल १०,२४० कवड्या मोजाव्या लागत असत, तर ३० हजार ७२० फुटक्या कवड्या मोजून रुपयाच्या मूल्याची प्रतिपूर्ती होत असे. आता कवडीला होलसेलमध्ये दोन रुपये तर किरकोळ बाजारात पाच रुपये किंमत आहे. यानुसार कवडीने २० हजार ते ५० हजार पट जास्त वाढ नोंदवली असून, तिचे मूल्य आता रुपयाच्या पुढे गेले आहे. यानुसार कवडीला किती महत्त्व आहे, हे अधोरेखित व्हावे.

कवडीचा उगम कुठे?
कवडी ही शंख शिंपल्याबरोबरच समुद्रातून शोधली जाते. गुजरात, गोवा, कोकण आदी समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागातून कवडी मुख्यत: धार्मिक स्थळांवर विकायला येते. साधारण चारशे रुपये किलोप्रमाणे ती सध्या मिळते. एका किलोत आकारानुसार दोनशे ते अडीचशे कवड्या बसतात. रामकुंड, त्र्यंबकेश्वर आदी धार्मिक स्थळी शंख-शिंपल्यांबरोबरच कवड्याच्या माळा विकणारे पथारीवाले असतात. व्यक्तीच्या गरजेनुसार व त्याच्या आर्थिक कुवतीनुसार पाच रुपये ते अगदी काळी कवडी असेल तर ५० रुपयांपर्यंतही ती विकली जाते.

गोगलगाईंपासून उत्पत्ती
शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. सारीपाट, चौसर आदी खेळांमध्ये कवड्यांचे महत्त्व होते. म्हणूनच आजही या खेळातील सोंगट्यांना ‘कवड्या’ असेच म्हटले जाते.

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

दागिन्यांमध्ये वापर
पूर्वी आफ्रिकेत आणि भारतात कवड्यांचा नाण्यांप्रमाणे उपयोग केला जात असे. सोन्याला ज्याप्रमाणे गंज लागत नाही, अगदी तसेच कवडीही कायमस्वरुपी गुळगुळीत, चकचकीत आणि एका आकाराची असल्याने तिचा पूर्वापार दागिन्यांमध्ये वापर केला गेला आहे.

धार्मिक क्षेत्रातही महत्त्व
मराठी विश्वकोषातील माहितीनुसार दक्षिण भारतात रेणुका, एल्लम्मा, मातंगी, मरीआई, भवानी, महालक्ष्मी इ. नावांनी गाजलेल्या देवींच्या उपासनाक्षेत्रात कवडीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोंधळी, भुत्ये, पोतराज, मातंगी, जोगती, जोगतिणी हे देवीचे उपासकवर्ग आपल्या अंगाखांद्यांवर कवड्यांचे अलंकार परिधान करतात.
गोंधळ्यांच्या, भुत्यांच्या, जोगतिणींच्या गळ्यांत कवड्यांच्या माळा असतात; भुत्यांचा शंकाकार टोप बाहेरून कवड्यांनी मढविलेला असतो. ते गळ्यातही कवड्यांच्या माळा घालतात. जोगतिणींच्या ‘जगां’ ना कवड्या गुंफलेल्या असतात. काखेत अडकविलेल्या भंडाराच्या पिशव्यांनाही कवड्या लावलेल्या असतात. परड्या कवड्यांनी सजविलेल्या असतात आणि या सर्व उपासकवर्गांच्या कंठातून गळ्यात असलेली देवीप्रतिमा ज्या जाड वस्त्रपटावर जडवलेली असते, तो पटही कवड्या गुंफून शोभिवंत केलेला असतो. प्रत्यक्ष देवालाही कवड्यांचा श्रृंगार प्रिय असल्याची धारणा देवीविषयक लोकगीतांत वारंवार व्यक्त झालेली आहे. तंत्रविद्येतही कवडीला प्रचंड महत्त्व आहे.

वास्तुशास्त्रातही कवडी
कवडी हे समुद्रात सापडणारे, गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळातही याचा वापर दान टाकण्यासाठी करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवड्या अद्यापि वापरण्यात येतात. तुळजापूर शहरात नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्‍या माळांची शंभरपेक्षा अधिक दुकाने थाटली जातात.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

कवडीला महाराष्ट्रामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक महत्त्व आहे. कारण आदिशक्तीचे रूप असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचे भक्त कवड्यांच्या माळा परिधान करून देवीची भक्ती करतात. तशी प्रथा पूर्वापार चालत आली आहे. त्याची साक्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजही कवड्यांची माळ परिधान करीत असत. याचे अनेक पुरावे सापडतात. म्हणूनच तुळजापूर शहरात नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्‍या माळांची शंभरपेक्षा अधिक दुकाने थाटली जातात. कवड्यांमध्ये अंबुकी कवडी व येडाई कवडी असे दोन प्रकार असतात. कवड्यांच्या माळा दक्षिण भारतातील चेन्नई येथून तुळजापुरात आणल्या जातात. कवडीची माळ गळ्यात घालून अंबाबाईचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा मागतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू ‘पार्थ पवार यांना आपण कवडीचीही किंमत देत नाही’ असे म्हटल्यानंतर जवळजवळ विस्मरणात गेलेली कवडी पुन्हा चर्चेत आली आहे. याचाच अर्थ कवडी चलनातून गेली असली तरी मनात आजही कायम आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com