अहो, आता आमच्या गावाचे काय होणार, सरपंचांना पडला बिकट प्रश्‍न

file
file

कामठी (जि.नागपूर)  :  जिल्हयातील ग्रामीण भागात अनेक कंपन्या तसेच वीटभट्ट्या आहेत. तेथे काम करणारे मजूर बाहेरगावचे आहेत किंवा कंपनीत जाताना गावातून थेट कंपनीत पोहचतात. उद्या गावाला संसर्ग झाला तर..? शासनाचे दुर्लक्ष असून, गावात कोरोना संक्रमण झाल्यास जबाबदार कोण, असा चिंतेचा प्रश्न ग्रामपंचायत सरपंचांनी उपस्थित केला आहे.

शिथिलता आल्याने प्रश्‍न वाढले
कामठी तालुक्‍यातील ग्रामपंचायत खसाळा, कवठा म्हसाळा, भिलगाव, खैरी, लिहगाव, गुमथळा, कढोली अशी अनेक गावे आहेत. टाळेबंदी झाल्यापासून तेथील सरपंच अहोरात्र मेहनत करीत असून शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत आहेत. ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सूचना आणि मार्गदर्शन करीत गावात त्यांना मास्क, सॅनिटायजर व गोरगरिबांना धान्यवाटप करीत आहेत. बाहेरील
कोणीही व्यक्ती गावात प्रवेश करू नये, यासाठी गावातील प्रत्येक रस्त्यावर बॅरिगेड्‌स लावून बंद करण्यात आले. परंतु, आज चौथ्या लॉकडाउनमध्ये शासनाने शिथिलता दिल्याने गावालगत असलेल्या कंपन्या व वीटभट्ट्यांवर काम करणारे मजूर गावातून सर्रास ये-जा करीत आहेत. ही स्थिती बघून गावात कोरोनाचे संक्रमण झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ व सरपंचांना पडला आहे. या आपतकालीन परिस्थितीत ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या विषयावर पं. स. कामठीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, यावर कोणतीही कारवाई अजूनपर्यंत झाली नसल्याचे खैरीचे सरपंच बंडू कापसे म्हणाले.

गावात आजार शिरण्याची शक्‍यता
ग्रामपंचायतीला लागून असलेले म्हसाळा टोळी वॉर्ड 3,4 अंतर्गत, रजा टाऊन, जगदंबानगर, शकुरनगर या दोन्ही वॉर्डात मुंबई, पुणेसारख्या "हॉट' शहरांतून काही लोक आलेले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. आज त्यांच्याद्वारे आमच्या गावात कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याची मौखिक माहिती शासकीय अधिकाऱ्यांना देऊनसुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे खसाळयाचे सरपंच रवी पारधी म्हणाले.

आमच्याकडे काहीच माहिती नाही
गावाला लागून दोन-तीन कंपन्या आहेत. तेथील काही मजूर कंपनीमध्येच राहतात. त्या कंपनीत काम करणारे काही मजूर भाड्याने गावात राहतात. त्यांची नोंदणी आमच्याकडे आहे. कंपनीत असणाऱ्या मजुरांची नोंदणी आमच्याकडे नसून ते कुठले आहेत, कोठून आले, कधी येतात, कधी जातात, काही माहीत नसल्याचे भिलगावचे सरपंच शीतल पाटील म्हणाले. गावाजवळ असलेल्या कंपन्यांमध्ये काम करीत असलेला मजूर तो कोठून आला व कुठला आहे, याची आमच्याकडे काहीच माहिती नाही. कंपनी व्यस्थापकांनी कंपन्यांमधील मजुरांची माहिती ग्रामपंचायतीला दिली नसल्याची तक्रार कढोलीचे सरपंच प्रांजल वाघ म्हणाल्या.

नियमांचे पालन करा
स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी व शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे.
-अरविंद हिंगे
तहसीलदार, कामठी

ग्रामस्तरीय समितीचा अधिकार
ग्रामस्तरीय समिती नियुक्त केली असून, ज्या सात लोकांचा समावेश आहे. त्यांना कंपनी व्यवस्थापकाशी मजूर संबंधित माहिती घेण्याचा अधिकार आहे.
-सचिन सूर्यवंशी
गटविकास अधिकारी, पं. स. कामठी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com