निवडणूक आटोपली अन्‌ कॉंग्रेसच्या सुरात झाला बदल, उपाध्यक्षपद कुणाकडे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

यापूर्वी जिल्हा परिषदेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी अध्यक्षपद कॉंग्रेस तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात आले होते. हेच सूत्र यंदाही कायम राहील, असा विश्‍वास काहींकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दोन्ही पदे कॉंग्रेसकडे ठेवण्याची भावना काहींची आहे. अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे. या निवडणुकीत मंत्री सुनील केदारांची महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्या होकारनंतरच अध्यक्ष निश्‍चित होणार असल्याचे सांगण्यात येते.

नागपूर : जिल्हा परिषदेची निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करून लढविली. याचा परिणामही दिसून आला. जुन्या सूत्रानुसार अध्यक्षपद कॉंग्रेस तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्याने सुरात बदल झाल्याची चर्चा आहे.

हे वाचाच - मी बँक अधिकारी आहे, तुमच्या मुलीसोबत लग्न करीन!

यापूर्वी जिल्हा परिषदेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी अध्यक्षपद कॉंग्रेस तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात आले होते. हेच सूत्र यंदाही कायम राहील, असा विश्‍वास काहींकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दोन्ही पदे कॉंग्रेसकडे ठेवण्याची भावना काहींची आहे. अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे. या निवडणुकीत मंत्री सुनील केदारांची महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्या होकारनंतरच अध्यक्ष निश्‍चित होणार असल्याचे सांगण्यात येते.

उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यास सलील देशमुख आणि दिनेश बंग हे दावेदार असल्याचे सांगण्यात येते. परंतु, दोन्ही महत्त्वाची पदे कॉंग्रेसनेच ठेवावी, अशी मागणी आता कार्यकर्ते करीत असल्याचे सांगितले जात आहे. तसे झाल्यास व कॉंग्रेसनेच उपाध्यक्षपदावर दावा केल्यास सुनील केदारांचे निकटवर्तीय मनोहर कुंभारे यांना हा मान मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

उपाध्यक्षांकडे आरोग्य आणि बांधकाम विषय समितीचे सभापतिपद जाते. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाखेरीज विषय समिती सभापतीसाठीसुद्धा काहींनी लॉबिंग सुरू केली आहे. या दोन पदांखेरीज चार सभापतींचीही निवड केली जाते. यात प्रामुख्याने शिक्षण, वित्त, समाजकल्याण, कृषी, महिला बालकल्याण तसेच पशुसंवर्धन विभाग यांचा समावेश आहे. या पदांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

सभापतिपदासाठी दावेदार

नाना कंभाले, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे, नव्यानेच कॉंग्रेसमध्ये आलेले तापेश्‍वर वैद्य हे कॉंग्रेसकडून सभापतिपदासाठी स्पर्धेत आहेत. तिकडे राष्ट्रवादीकडून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या उज्ज्वला बोढारे आणि ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर कोल्हे हे दावेदार असल्याचे सांगितले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will be Zilla Parishad's vice-president?