काय हो, अपक्षांची बंडखोरी कायम राहील का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

काही तिकिट न भेटलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाशी बंडखोरी करीत रणशिंग फुंकले. परंतु अपक्ष हे राजकीय पक्षांना पुरून उरतील का, हे येणारा काळच सांगेल.

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी हिंमत दाखवित उमेदवारी मिळविली. काही तिकिट न भेटलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाशी बंडखोरी करीत रणशिंग फुंकले. परंतु अपक्ष हे राजकीय पक्षांना पुरून उरतील का, हे येणारा काळच सांगेल.

कोदामेंढी : मौदा तालुक्‍यात पाच जिल्हा परिषदांकरिता 37 उमेदवारांचे 47 अर्ज, तर पंचायत समितीकरिता 64 उमेदवारांचे 78 अर्ज प्राप्त झालेत. आज झालेल्या छाननीनंतर जिल्हा परिषदेचा एक, तर पंचायत समितीचे दोन अर्ज अवैध ठरले. जिल्हा परिषदेकरिता 35 उमेदवारांचे 46 अर्ज, तर पंचायत समितीकरिता 62 उमेदवारांचे 76 अर्ज वैध ठरले आहेत. पक्षाची उमेदवारी मिळावी, याकरिता बऱ्याच नेत्यांनी ताकद लावली. मात्र, पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची ताकद ठेवत दोन-तीन असे नामांकन अर्ज दाखल केले आहेत. मात्र, चिन्ह वाटपाच्या दिवशी किती उमेदवार पक्षाशी बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवणार ते कळेल.

अधिक वाचा - काय चूक होती पित्याची की मुलानेच केले असे काही...

याच दिवसापासून भाजपची उमेदवारी अशोक हटवार की सदानंद निमकर, अशी चर्चा रंगली होती. अखेरच्या दिवशी भाजपने अशोक हटवार यांची वर्णी लावली. त्यामुळे सदानंद निमकर यांच्यापुढे पेच निर्माण झाला. कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे उमेदवार निश्‍चित झाल्याने अखेर सदानंद निमकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्याचप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते असलेले नरेश बावनकुळे यांनीदेखील भाजपकडे उमेदवारीकरिता तगादा लावला होता. त्यामुळे आता सदानंद निमकर आणि नरेश बावनकुळे पक्षाशी बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवणार की काय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कॉंग्रेसकडून योगेश देशमुख, सेनेकडून प्रशांत भुरे तर मनसेकडून राजेश देवतळे यांची वर्णी लागली आहे.
 

पक्षाच्या उमेदवारांत "थोडा गम, थोडी खुशी'
मौदा : तालुक्‍यातील पाच जिल्हा परिषदांकरिता 47 नामांकने दाखल करण्यात आलीत. त्यात छाननी झाल्यानंतर 1 नामांकन अवैध ठरविण्यात आले. 10 पंचायत समित्यांकरिता 78 नामांकने दाखल करण्यात आली होती. त्यात 2 नामांकने अवैध ठरविण्यात आली. सोमवारी दुपारी 3 वाजतापर्यंत नामांकन अर्ज घेण्यात आले. आज मंगळवारी छाननी करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेमध्ये खात-रेवराल येथील एक व रेवराल पंचायत समितीमध्ये दोन नामांकने अवैध ठरविण्यात आली.
नामांकन भरतेवेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या समर्थनार्थ अनेक शिवसैनिक उपस्थित होते. भाजप उमेदवारांसोबत माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर उपस्थित होते. कॉंग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम काळमेघ उपस्थित होते. मौदा तालुक्‍यात तीनच पक्षांच्या उमेदवारांनी पक्षाचे "एबी फोर्म' जोडलेले आहे. ज्या उमेदवारांना "एबी फार्म' मिळाले नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन आपली उमेदवारी पक्की केली.

अधिक वाचा - इलेक्‍ट्रिकल व्हेईकल हाच पर्याय ः उदयन पाठक

मौदा तालुका जिल्हा परिषदेचे उमेदवार
तारसा-धामणगाव : देवेंद्र पंजाबराव गोडबोले (शिवसेना), लक्ष्मण उमाळे (कॉंग्रेस), कैलास बरबटे (भाजप), बहुजन पॅनेल प्रियबालक साधू सोमकुवर व अपक्ष उमेदवार.
आरोली-कोदामेंढी : प्रशांत भुरे (शिवसेना), अशोक हटवार (भाजप), योगेश देशमुख (कॉंग्रेस), सदानंद कुंभलकर (प्रहार), सदानंद निमकर (अपक्ष) व अपक्ष उमेदवार.
खात-रेवराल : सुनीता वैद्य (1शिवसेना), दुर्गा ठाकरे (कॉंग्रेस), राधा अग्रवाल (भाजप) व अपक्ष उमेदवार. धानला-चिरव्हा : सुभाष (बंडू) सरवे (शिवसेना), चांगो तिजारे (भाजपा), तापेश्‍वर वैद्य (कॉंग्रेस) व अपक्ष उमेदवार.

अधिक वाचा - ....आणि मुले बोलू लागली

बोथिया पालोरा पं. स.मधून कॉंग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद
रामटेक ः पंचायत समितीच्या 61 उमेदवारांपैकी 2 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. मात्र, निवडणूक विभागाकडून माहिती देण्यात आली नाही. जि. प.च्या 5 जागांसाठी 51 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. कांद्री जि. प. क्षेत्रातून अपक्ष उमेदवार सुरेश भांडारकर यांचाही अर्ज छाननीत बाद झाला. बोथिया पालोरा पंचायत समिती क्षेत्रातून उमेदवारी दाखल केलेले कॉंग्रेसचे भगवंत भलावी यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. तर, कांद्री पं. स. क्षेत्रातील अपक्ष उमेदवार पूजा वासनिक यांचा अर्ज उमेदवारी अर्जावरील एक स्वाक्षरी सुटल्याने बाद ठरविण्यात आला.

हिंगण्यात अर्ज बाद
हिंगणा : तालुक्‍यात 7 जिल्हा परिषद क्षेत्र व 14 पंचायत समिती क्षेत्राच्या निवडणुकीसाठी 90 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. आज मंगळवारी छाननीदरम्यान डिगडोह-इसासनी जिल्हा परिषद क्षेत्रातील इमरता संतोष कटरे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरला. यामुळे आता जिल्हा परिषदेकरिता 31 तर पंचायत समिती क्षेत्रासाठी 58 उमेदवार रिंगणात उरले आहेत. निवडणुकीमुळे ग्रामीण राजकारणात रंग चढला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने काही ठिकाणी आघाडी केली आहे. भाजप व शिवसेना स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहे.डिगडोह-इसासनी जिल्हा परिषद क्षेत्रातील भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवार इमरता संतोष कटरे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत जातप्रमाण पत्राची पोचपावती न जोडल्यामुळे बाद झाला.

 

83 उमेदवार पास तर 4 नापास
उमरेड : तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या 4 गटासाठी व पंचायत समितीच्या 8 गणासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज मंगळवारी छाननी पार पडली. यात जिल्हा परिषद गटासाठी 39 तर पंचायत समितीच्या गणासाठी 44 असे एकूण 83 अर्ज योग्य ठरले आहेत. त्रुटी असल्यामुळे चार अर्ज बाद झालेत. बाद झालेल्यांमध्ये दोन भाजप तर दोन कॉंग्रेस असे नामांकन अर्ज होते. त्यांना पक्षाचा बी अर्ज जोडला नसल्याने बाद झाल्याची माहिती देण्यात आली. एकूण 83 अर्जामध्ये 23 अर्ज अपक्ष भरले असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. आता सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे कोण अर्ज मागे घेतील तर कोण तटस्थ राहील? बसपच्या माजी पंचायत समिती सदस्य मीनाक्षी विशाल बिलाडे यांना यावेळी अपक्ष अर्ज भरावा लागला. कारण बहुजन समाज पार्टीने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.

पारशिवनी तालुक्‍यातून एकच अर्ज बाद
टेकाडी : पारशिवनी तालुक्‍यातील चार जिल्हा परिषद सर्कलसाठी 48 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. तर आठ पंचायत समितीसाठी 52 नामांकने होती. छाननीत माहुली सर्कलमधून अपक्ष उमेदवार संजय भय्याजी निंबुलकर यांचा अर्ज अपात्र ठरला. नागपूर जिल्हा अध्यक्ष पदाच्या दावेदारीत असलेल्या टेकाडी-कांद्री सर्कलमधून भाजपमध्ये सध्या चांगलीच घालमेल सुरू आहे. स्थानिकांना प्राधाण्य देण्यात यावे यासाठी टेकाडीच्या सरपंच सुनीता मेश्राम व शालिनी बर्वे यांनी मेहनत घेतली. सरपंचपदी सोळाशे मतांनी निवडून आलेल्या मेश्राम यांना डावलून बर्वे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर मेश्राम यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the rebellion of the independents continue?