मालमत्तेचा वाद अन्‌ राजकीय पक्षाच्या कार्यालयावर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

इमारतीच्या वरच्या माळ्यावर गुप्ता यांची सून मीना गुप्ता रेस्टॉरेंट चालविते. तिने मालमत्ता दुसऱ्याला विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने स्थगनादेश दिला आहे.

नागपूर : मालमत्तेच्या हक्काच्या वादातून सोमवारी दुपारी गणेशपेठेतील भाजप कार्यालयावर महिलेने साथीदाराच्या मदतीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला होता. आमदार गिरीश व्यास यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मीना गुप्ता आणि राजू काळमेघ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक पुतळळ्याजवळ भाजप कार्यालय होते. ही इमारत पडल्यामुळे कार्यालय गणेशपेठेतील एका अपार्टमेंटमध्ये हलविण्यात आले. पं. दिनदयाल उपाध्याय स्मृती ट्रस्टने 2011 मध्ये टिळक पुतळ्याजवळच्या कार्यालयालगतची महादेव प्रसाद गुप्ता यांची इमारत विकत घेतली होती. या इमारतीच्या बहुतांश भागावर ट्रस्टचा ताबा आहे. 

असे का घडले? - कोणी सांगेल का? माझी काय चूक होती...

इमारतीच्या वरच्या माळ्यावर गुप्ता यांची सून मीना गुप्ता रेस्टॉरेंट चालविते. तिने मालमत्ता दुसऱ्याला विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने स्थगनादेश दिला आहे. सोमवारी दुपारी मीना तिचा साथीदार राजू काळमेघसोबत तेथे पोहोचली. तिने भाजप कार्यालयाला लावलेले कुलूप तोडून कब्जा करण्याचा प्रयत्न केला. हे माहित होताच मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्यांनी पोलिसांना कळवून मीना तसेच तिच्या साथीदाराला अटक करण्याची मागणी केली. 

गणेशपेठ पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मीना, तिचा साथीदार आणि अन्य काहींना पोलिस ठाण्यात नेले. तेथे दोन्ही पक्षाची बाजू ऐकूण आणि कागदपत्रे तपासल्यानंतर आमदार गिरीश व्यास यांची तक्रार नोंदवून मीना गुप्ता आणि राजू काळमेघविरुद्ध जबरदस्तीने कब्जा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. 

यापूर्वीही प्रयत्न

आमदार व्यास याच्या माहितीप्रमाणे मीनाने यापूर्वी मागच्या बाजूची भिंत तोडून आत शिरण्याचा आणि त्या खोलीत कुलूप लावण्याचा प्रयत्न केला होता. एका खोलीत भाजपचे निवडणूक प्रचार साहित्य ठेवण्यात आले आहे. त्याचे कुलूप तोडण्याचा मिना अणि तिच्या साथीदाराने प्रयत्न केला. तेथे लॉंड्री चालविणाऱ्यांनीही भाजपला यापूर्वीच दुकानांचा ताबा दिल्याचे सांगितले.

अधिक वाचा - अंकिताला जिवानिशी ठार करणे हाच होता विकेशचा उद्देश

वारसदारांची सहमती

भाजप नेत्यांनी सादर केलेली कागदपत्र तपासली असता त्यातून जमिनीच्या मूळ वारसदारांची सहमती असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी आता मिना आणि साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman attempts to seize BJP's office in Nagpur