नवविवाहितेने घेतला टोकाचा निर्णय, पण कशासाठी? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

काहीच महिन्यांपूर्वी लग्न झाले. संसार सुखाचा होईल असे स्वप्न पाहत असताना पतीने पैशांसाठी शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करू लागला. पैसे आणून देण्याचे आश्‍वासन दिल्यावरही मारहाण कमी झाली नाही. म्हणून नवविवाहितेने टोकाचा निर्णय घेतला... 

नागपूर : लग्न झाल्याच्या दोनच महिन्यानंतर माहेरून वीस हजार रुपये आणण्यासाठी नवविवाहितेवर अत्याचार केला. मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी हुंडालोभी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सपना सूरज महतो (वय 25, रा. इसासनी टेकडी, जुनी खदान) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज महतो हा मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून नोकरीवर आहे. गेल्या मे महिन्यात सूरजचे सपनाशी लग्न झाले. दोन महिन्यांपर्यंत दोघांचा संसार नीट चालला. त्यानंतर "माहेरून तू काहीही आणले नाही. तुला प्रेझेंट पण मिळाले नाही. तू दागिनेसुद्धा वडिलांकडून मागितले नाही', असा तगादा सूरज लावत होता. सपनाच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे सपना पतीचा मानसिक व शारीरिक छळ सहन करीत होती. 

काय आहे या लिंकमध्ये? - आश्रमशाळा अधीक्षकाने शाळेत घेतला गळफास

गेल्या काही दिवसांपासून सूरजने सपनाला माहेरून वीस हजार रुपये आणण्यासाठी मारहाण करणे सुरू केले. तिच्याशी बळजबरी करणे तसेच अत्याचार सूरज करीत होता. हा प्रकार सपनाने आईला सांगितला होता. त्यामुळे माहेरच्यांनी काही पैसे गोळा करून पुढच्या महिन्यात देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, सूरजने सपनाला रोजच त्रस्त करणे व मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती कंटाळली होती. तिने कंटाळून वडिलांना फोन करून पैशाची मागणी केली. मात्र, वडिलांनी आर्थिक परिस्थितीचा हवाला देत वीस हजार रुपये गोळा करण्यास असमर्थता दर्शविली. 

त्यामुळे सपनाला पतीचा रोजचा त्रास सहन करावा लागत होता. शेवटी सपनाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. मंगळवारी पती ड्युटीवर गेला होता. घरी कुणी नसताना सपनाने बल्लीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी सूरज घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याला पश्‍चाताप होत होता. मात्र, आता त्याचा काहीही उपयोग नसल्याचे लक्षात आले. त्याने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

क्लिक करा - आला 'हिवसाळा', स्वेटर जॅकेटसह रेनकोटा घाला

चारित्र्यावरही संशय

माहेरून पैसे आणण्याच्या तगाद्यासह सूरज सपनाच्या चारित्र्यावरही संशय घेत होता. "तुझे कुणाशीतरी प्रेमसंबंध आहेत. तो युवक तुला भेटायला येतो' असे आरोप करून तिला मारहाण करीत होता. चारित्र्याच्या संशयालासुद्धा सपना कंटाळली होती. सपनाचे वडील जीयालाल चुटलेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman commits suicide in Nagpur