त्या करतात ऑनलाईन गप्पा, अभिवाचन, काव्य संमेलन आणि पुस्तक प्रकाशनही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

अनेकांनी या काळात राहिलेले लिखाण पूर्ण केले तर, काहींनी नवीन गोष्टी शिकून घेतल्या. सोशल मीडीयावर लिखाणाचे स्वातंत्र्य असल्याने, तेथेही अनेकजणी व्यक्त झाल्या. सोशल मीडीयाचे तंत्र शिकून घेत, त्यावर आयोजित सर्व कार्यक्रमामध्ये महिला साहित्यिकांनी सहभाग नोंदवला.

नागपूर : लॉकडाऊनचा काळ सुखाचा, असे महिला साहित्यिकांना वाटल्यास नवल नाही. कारण नोकरी, घर, अशी रोजची धावपळ त्यांच्या मागे नसल्याने त्यांनी या काळात खूप वाचले, खूप लिहिले आणि ते ऑनलाईन प्रकाशितही केले. एवढेच नव्हे तर गप्पा-गाण्यांचा कविता वाचनाचा फडही ऑनलाईनच जमवला आणि या काळाचा खूप चांगला उपयोग करून घेतला.

लॉकडाऊनच्या काळातही शहरातील महिला साहित्यिकांनी आपल्या लिखाणाला आणि कार्याला मोकळे आकाश करून दिल्याचे दिसून आले. ऑनलाइन काव्य संमेलन, गाणी, गप्पा, अभिवाचन यासह ऑनलाइन पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रमही पार पाडण्यात आल्याचे लेखिका लीना निकम यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात सर्वच सदस्य घरी होते. घरातील कामवालीही सुटीवर होती अशात घरातील कामाची जबाबदारी कुटुंबातील सदस्यांनी वाटून घेतली. ऑफीसला जायची घाई नव्हती. त्यामुळे लिखाण, वाचन, मनन या सर्वांसाठी भरपूर वेळ मिळाला. अनेकांनी या काळात राहिलेले लिखाण पूर्ण केले तर, काहींनी नवीन गोष्टी शिकून घेतल्या. सोशल मीडीयावर लिखाणाचे स्वातंत्र्य असल्याने, तेथेही अनेकजणी व्यक्त झाल्या. सोशल मीडीयाचे तंत्र शिकून घेत, त्यावर आयोजित सर्व कार्यक्रमामध्ये महिला साहित्यिकांनी सहभाग नोंदवला.

राज्यस्तरीय ऑनलाइन कविसंमेलन
अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेच्यावतीने एक अभिनव उपक्रम याकाळात राबविण्यात आला. यात सर्व सहभागी कवि, कवयित्रींना सहभागाकरिता डिजिटल पेपरलेस सन्मानपत्र देण्यात आले. तसेच केवळ कवितेचा सन्मान म्हणून उत्कृष्ट रचनेला सर्वोत्कृष्ट काव्य सन्मान आणि युट्यूब वर सर्वाधिक प्रसारीत झालेल्या रचनेला लोकप्रियता सन्मान पत्र देण्यात आले. ऑनलाइन कविसंमेलनात राज्यभरातील कविंनी सहभाग नोंदवित आपली कला ऑनलाइन सादर केली.

आवडत्या पुस्तकांवर ऑनलाइन निबंध स्पर्धा
छंद सम्राट बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात स्पर्धकांना ऑनलाइन नोंदणी करीत, आपल्या आवडत्या पुस्तकावर निबंध लिहायचा होता. ही स्पर्धाही बरीच गाजली. मायमराठी, पद्मगंधा प्रकाशन, परीवर्तन विचार मंच, दिनबंधू, सावित्रीबाई फुले संघटना इत्यादी अनेक समुहाने ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

सविस्तर वाचा - घरफोडीतील पाच लाखांसाठी सनीचा गेम

लॉकडाऊन आनंदाचे
ऑनलाईन वेबीनार, काव्यसंमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून, लॉकडाऊनचा काळही आम्ही आनंदाने व्यतीत केला. अनेक दिवसांपासून राहून गेलेले बरेच लिखाण या काळात पूर्ण करता आले. काहींनी आपल्या लिखाणाचे प्रकाशनही ऑनलाइन पद्धतीने केल्याने, त्यांना अधिक वाचकांपर्यंत पोहोचता आले. सोशल मीडीयावरील लिखाणही मोठ्या प्रमाणात वाढले.
डॉ. लीना निकम, साहित्यिक, नागपूर.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womens are enjoying poems, books online