मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात कन्हान नदीत बुडाला युवक 

young man drowned in the Kanhan River in an attempt to save the child
young man drowned in the Kanhan River in an attempt to save the child

कामठी  (जि. नागपूर) : कॅन्टोमेंट परिसरातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या तीरावरील गाडेघाट येथील अम्माच्या दर्ग्यात परिवारासह दर्शनाला गेलेल्या ३२ वर्षीय युवकाचा कुटुंबीयांसमोर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १७) सकाळी नऊच्या सुमारास घडली. मृताचे नाव मोहसीन हसन अली असून, कामठी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हसन अली यांचा मुलगा आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील कामठी नगरपालिकेचे माजी अध्यक्ष हसन अली यांचा मुलगा मोहसीन गुरुवारी (ता.१७)  ला सकाळी सात वाजेच्या सुमारास  भावाच्या परिवारासह घरी आलेल्या पाहुण्यांना घेऊन कन्हान नदीच्या तीरावर असलेल्या अम्माच्या दर्गा येथे दर्शन घेण्याकरिता गेला.

सध्या नदीला पाणी जास्त असल्याने ते कन्हानमार्गे गाडेघाट येथील दर्ग्यात पोहोचले. दीड तास परिसरात फेरफटका मारल्यानंतर त्यांनी  अंघोळीचा  बेत केला व पाण्यात उतरले. मात्र काही बच्चे कंपनी खोल पाण्यात जात असल्याचे पाहून मोहसीनने त्यांना पाण्याबाहेर आणण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला व सर्वांच्या देखत पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या सोबत असलेल्या परिवारातील सदस्यांनी आरडाओरड केल्याने गाडेघाट  येथील जीवन रक्षक पथकाचे पुरुषोत्तम कावळे व नागरिक धावून आले. कावळे यांच्या जीवनरक्षक पथकाच्या मदतीने त्याचे शव पाण्यातून बाहेर काढले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने  कामठीला पोहोचली असता नागरिकांनी नदीवर एकच गर्दी केली होती. सदर घटनास्थळ कान्हान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने याबाबत पोलिस स्टेशनला याची सूचना देण्यात आली. 

परिसरात हळहळ

परिवाराने कोणतीही तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी शव ताब्यात न घेता परिवाराच्या स्वाधीन केले. त्यामुळे शवविच्छेदन करण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे. मृताला पत्नी व एक तीन वर्षाचा मुलगा आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com