"पब्जी'च्या वेडातून नैराश्‍य वाढल्याने युवतीने अखेर घेतला "हा' चुकीचा निर्णय...

दिलीप चव्हाण
रविवार, 12 जुलै 2020

या धावपळीत बातमी कळायला उशीरच झाला. नागपूरला तिच्यावर उपचार सुरू होते. भोजापूर गावात या प्रकरणाची कोणालाही कुणकुण लागली नव्हती. तिने विष घेतले एवढेच गावक-यांना ठावूक होते. मात्र शासकीय वैद्यकीय रूग्णालयातून स्थानिक पोलिस ठाण्यात तिच्या मृत्यूची नोंद झाली तेव्हा प्रकरण उघडकीस आले

कुही (जि.नागपूर) : तिचे नाव फारीया निजाम पठाण, वय 19 वर्षे. कुही तालुक्‍यातील भोजापूर या छोटयाशा खेडयात ती राहात होती. गेल्या काही दिवसांपासून तिला मोबाईलचे वेड लागले होते. खेळता खेळता ती "पब्जी' गेम खेळायला लागली. त्यानंतर तिच्या वागणूकीत अचानक बदल व्हायला लागला. ती एकांतप्रिय झाली. तिचे पब्जीचे वेड वाढत गेले. घरच्या कुणालाही तिच्या या वेडाची कल्पना नसावी. अखेर फारीया निजाम पठाण (वय 19) हिने पब्जीच्या नादात तिने भयंकर कृत्य केले. तिच्या या कृत्याने सगळयांची मने हेलावून गेली.

अधिक वाचा : बिअर बार चालकांसाठी आनंदाची बातमी, सरकारच्या नव्या सूचना जाहीर वाचा ...

कुणालाही नव्हती माहिती
पोलिसांनी नातेवाइकांकडून नोंदविलेल्या बयानानुसार, फारिया निजाम पठाण ही गेल्या तीन महिन्यांपासून सतत पब्जी खेळायची. त्यामुळे ती सतत नैराश्‍यात राहायची. त्या नैराश्‍यातूनच तिने एक जुलैला दुपारी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्या दिवशी कुणालाही याबाबत काहीही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता तिची प्रकृती बिघडली. आईवडिलांनी तिला कुही ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेले. तेथील डॉक्‍टरांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तिला "रेफर' केले. तेथील डॉक्‍टरांनी तपासून फारियाला 2 जुलै रोजी मृत घोषित केले. कुही पोलिसांनी 10 जुलैला नागपूर शासकीय रुग्णालयातून आलेल्या अहवालानुसार घटनेची नोंद घेतली.

हेही वाचा :सीआयडी चौकशीस कारण की...

पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
या धावपळीत बातमी कळायला उशीरच झाला. नागपूरला तिच्यावर उपचार सुरू होते. भोजापूर गावात या प्रकरणाची कोणालाही कुणकुण लागली नव्हती. तिने विष घेतले एवढेच गावक-यांना ठावूक होते. मात्र शासकीय वैद्यकीय रूग्णालयातून स्थानिक पोलिस ठाण्यात तिच्या मृत्यूची नोंद झाली तेव्हा प्रकरण उघडकीस आले. पुढील तपास ठाणेदार पंजाबराव परघणे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार ओमकार डहारे करीत आहेत.

संपादन : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young woman finally took the wrong decision due to growing frustration due to the madness of "Pubji"