प्रतापनगर चौकात होते शंभरावर नागरिक अन् दोघांनी रॉडने केला बहिणीच्या प्रियकराचा खून

अनिल कांबळे
शुक्रवार, 5 जून 2020

कार्तिकला रक्‍ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर मारेकरी दुचाकीने पळून गेले. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, सहाय्यक आयुक्त केशव शेंगळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह रुग्णालयात पाठवून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

नागपूर : बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी धमकी देऊनही ऐकत नसलेल्या प्रियकराचा भावाने लोखंडी रॉडने हल्ला करून खून केला. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता गोपालनगरात घडली. कार्तिक सारवे (वय 24, रा. गोपालनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक सारवे हा नोकरीच्या शोधासाठी नागपुरात आला होता. त्याने गोपालनगरात भाड्याने रूम घेतली होती. काणे यांच्याकडे युसीएन केबल वितरणाच्या कामात हेमंत झोडापे यांच्या कार्यालयात कार्तिक वसुली आणि तंत्रज्ञ म्हणून काम करीत होता. गुरुवारी सकाळी 11 वाजता नेहमीप्रमाणे त्याने झोडापे यांचे कार्यालय उघडले. त्यानंतर दुपारी तो आयटी पार्कजवळ असलेल्या काणे यांच्या कार्यालयात गेला होता. तेथून तो (एमएच-31,ईडब्ल्यू-0374) क्रमांकाच्या दुचाकीने परत येत होता.

अधिक माहितीसाठी - नववी ते बारावीच्या वर्गांबाबत शिक्षण संस्था मंडळाने दिली महत्त्वाची सूचना...

गोपालनगरातील श्री गिफ्ट ऍण्ड टॉय दुकानाजवळून येत असताना दोन दुचाकीस्वार पाठलाग करीत असताना त्याला दिसले. त्यामुळे कार्तिकने दुचाकी जोरात पळवायला सुरुवात केली. मात्र, काही अंतरावरच पाठीमागून दुचाकीने आलेल्या आरोपी अमोल घाडगे याने दुचाकीवरूनच कार्तिकच्या डोक्‍यात लोखंडी रॉड मारला. कार्तिक जमिनीवर कोसळला. त्यानंतर दुचाकीवरून उतरून दोन्ही आरोपींनी कार्तिकच्या डोक्‍यावर रॉडने सपासप वार करून जागीच ठार केले. 

कार्तिकला रक्‍ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर मारेकरी दुचाकीने पळून गेले. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, सहाय्यक आयुक्त केशव शेंगळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह रुग्णालयात पाठवून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जाणून घ्या - विचार जुळले, मन जुळले आणि ते झाले जीवनसाथी

प्रेमासाठी वाट्टेल ते..!

कार्तिक याचे जयताळा येथील तरुणीशी प्रेमसंबंध होते. प्रेमाची कुणकुण तरुणीच्या भावापर्यंत पोहोचली. त्यामुळे विषय वाढविण्यापेक्षा कार्तिकची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अमोलने कार्तिकची भेट घेतली. त्याला बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी धमकी दिली. मात्र, त्याने "प्रेमासाठी वाट्टेल ते...' असे म्हणून अमोलला फटकारले होते. 

हत्याकांड सीसीटीव्हीमध्ये कैद

कार्तिक हा दुचाकीने जात असताना अमोल आणि त्याचा मित्र दुचाकीने पाठलाग करीत होते. कार्तिकच्या डोक्‍यावर रॉड मारून खाली पाडल्यानंतर खून करण्यात आला. हा सर्व प्रकार रस्त्यावरील आणि काही दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, अमोलसोबत असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे.

सविस्तर वाचा - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चौघांनी पाजली दारू, पुढे काय झालं वाचा...

नागरिकांची बघ्यांची भूमिका

भरदुपारी आणि चौकात कार्तिकवर दोघांनी हल्ला केला. कार्तिकला खाली पाडून जीव जाईस्तोवर रॉडने मारहाण करण्यात आली. हे हत्याकांड पाहण्यासाठी जवळपास चौकात शंभरावर नागरिक गोळा झाले होते. एवढ्या लोकांसमोरच हे हत्याकांड घडले. मात्र, कुणीही मदतीला धावून आले नाही. प्रत्येकांनी बघ्यांची भूमिका घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth killed in pratap nagar chowk