
पंकजने यापूर्वी अनेक प्रकल्पांवर कार्य केल्याने हे आव्हान स्वीकारले आणि सर्व जण कामाला लागले. पाचशे एकरात पसरलेल्या घनदाट जंगलात व दोन्ही बाजूंनी दऱ्याखोऱ्या असताना कोणत्याही आधाराविना ‘स्काय वॉक’ उभारणे खूप कठीण काम होते. त्यासाठी दोनशे टन वजनाच्या मशीनची गरज होती.
नागपूर : एखादा महत्त्वाकांक्षी प्रकल्प किंवा वास्तू निर्मितीसाठी उच्चशिक्षित अभियंताच असावा लागतो असे नाही. नवनव्या कल्पनेचा अभ्यास करणारा कृतिशील माणूसही मोठमोठे अकल्पनीय कार्य प्रत्यक्षात उतरवू शकतात. अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अचाट प्रकल्प काटोल (जि. नागपूर) येथील २५ वर्षीय युवक पंकज कुमेरियाने साकारला आहे. बारावीपर्यंत शिकलेल्या पंकजने बिहारमधील आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या राजगीरमध्ये देशातील एकमेव असा काचेचा पूल (स्काय वॉक) तयार करून विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
काटोल तालुक्यातील छोट्याशा खामगावमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेला पंकज मुळात साहसीवीर आहे. ‘ॲडव्हेंचर स्पोर्ट्स’च्या निमित्ताने काही महिन्यांपूर्वी तो आपल्या मित्रांसह राजगीरमध्ये गेला होता. यावेळी तेथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान स्काय वॉकची कल्पना पुढे आली. ‘तुम्ही असा पूल तयार करू शकाल काय,’ अशी विचारणा तेथील अधिकाऱ्यांनी केली.
पंकजने यापूर्वी अनेक प्रकल्पांवर कार्य केल्याने हे आव्हान स्वीकारले आणि सर्व जण कामाला लागले. पाचशे एकरात पसरलेल्या घनदाट जंगलात व दोन्ही बाजूंनी दऱ्याखोऱ्या असताना कोणत्याही आधाराविना ‘स्काय वॉक’ उभारणे खूप कठीण काम होते. त्यासाठी दोनशे टन वजनाच्या मशीनची गरज होती. पंकज व मित्रांनी छोट्या मशीन्सच्या साहायाने दिवस-रात्र एक करीत अवघ्या चार महिन्यांत आयुष्यातील सर्वांत मोठे ‘चॅलेंज’ असलेला स्काय वॉक पूर्ण केला.
इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना असलेला आणि काच व स्टीलच्या फ्रेम्सपासून तयार करण्यात आलेला हा स्काय वॉक अडीचशे फूट उंच, ९० फूट लांब व सहा फूट जाड आहे. त्यावर प्रत्येकी पंधरा मिमी जाड काचेचे तीन स्तर आहेत. आरपार दिसणाऱ्या या पुलावरून एकाचवेळी ४० पर्यटक चालू शकणार आहेत. तसेच शेवटच्या टोकावर बारा जण उभे राहू शकतील.
पुलावरून चालताना पर्यटकांना हवेत झुलण्याचा थरार अनुभवता येणार आहे. त्यांना आणखी रोमांचकारी अनुभव यावा, यासाठी लवकरच तेथे विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे पंकजने सांगितले. खांबांचा आधार नसलेला हा देशातील पहिला स्काय वॉक आहे, हे उल्लेखनीय. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या स्काय वॉकवर केवळ दीड कोटी रुपयांचा खर्च आला आहे. भविष्यात हा स्काय वॉक निसर्ग पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निश्चितच आकर्षणाचे केंद्र ठरू शकते.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या पंकजने ‘नेल इंडिया ॲडव्हेंचर प्रा. लि.’ ही कंपनी स्थापन करून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. काटोलसह पुण्यातही कंपनीची शाखा आहे. नवोपक्रम करण्यात हातखंडा असलेल्या पंकजने जम्मू-काश्मीर वगळता देशात सर्वच ठिकाणी विविध प्रोजेक्ट्स उभारून यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावले आहे. त्याने यापूर्वी द्वारका फन प्लॅनेट, अंबिका फार्म्ससह अनेक ठिकाणी ‘ऍडव्हेंचर राईड्स’ची निर्मिती केली आहे. याशिवाय हवेत चालणारी सायकल, स्काय रोलर व रोलर कोस्टरसह अनेक नवनवीन प्रॉडक्ट्स तयार करून देशविदेशात निर्यात केले आहेत.
क्लिक करा - अंकिता जळीतकांड : आरोपीतर्फे वकीलपत्र सादर; विकेश नगराळेची पत्नी, कुटुंबीयांची उपस्थिती
पंकज व मित्रांनी तयार केलेल्या स्काय वॉकची देशभर चर्चा व कौतुक होत आहे. प्रिंट मीडियासह अनेक चॅनेल्सनी त्याच्या या प्रोजेक्टला भरभरून प्रसिद्धी दिली आहे. पंतप्रधान कार्यालयानेसुद्धा दखल घेतल्याचे पंकजने सांगितले. भविष्यात संधी मिळाल्यास पंकजला जगातला सर्वात मोठा स्काय वॉक भारतात बनवायचा आहे. त्याचे हे स्वप्नही आहे.
संपादन - नीलेश डाखोरे