Video : ‘कोरोना’त मद्यपींचे वांदे झाल्याने घडतायेत असे धक्कादायक प्रकार ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

जयस्वाल यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात खामगाव येथील डीलर कडून 15 लाख रुपयांचा अंदाजे 800 बॉक्‍स देशी दारूचा माल आणून दुकानात साठवून ठेवला होता.

मोताळा (जि.बुलडाणा) : येथील पंचायत समितीचे नजीकचे देशी दारूचे दुकान फोडून 2 लाख 90 हजार रुपये किंमतीचे तब्बल 114 बॉक्‍स दारू लंपास झाल्याची घटना गुरुवारी (ता.23) पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संजय श्रीकांत जयस्वाल (48, रा. बुलडाणा) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, मोताळा पं.स.नजीक त्यांची देशी दारूची दुकान आहे. विजय मधुकर अहीर (रा. बुलडाणा) हे या दुकानातून किरकोळ दारूची विक्री करतात. श्री जयस्वाल यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात खामगाव येथील डीलर कडून 15 लाख रुपयांचा अंदाजे 800 बॉक्‍स देशी दारूचा माल आणून दुकानात साठवून ठेवला होता. त्यापैकी 60 बॉक्‍स दारूची ग्राहकांना विक्री करण्यात आली होती.

 

हेही वाचा - मैं कोरोना हू, बुलाता हू, मगर आने का नहीं; यांची अफलातून शक्कल!

दरम्यान, 22 मार्चला जनता कर्फ्यूपासून दुकान बंद असून, 23 मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग बुलडाणा यांनी सदर दारू दुकानाचा समोरील दरवाजा सील केला आहे. यावेळी दुकानात एकूण 784 बॉक्‍स दारूचा साठा होता. बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून आत प्रवेश केला व देशी दारूचे 2 लाख 90 हजार रुपये किंमतीचे तब्बल 114 बॉक्‍स लंपास केले. गुरुवारी सकाळी सदर प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. 

यावेळी बुलडाणा येथील श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्‍सपर्टच्या टीमला पाचारण करण्यात आले होते. चोरट्यांनी दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व त्याचे साहित्यसुद्धा चोरून नेल्याची चर्चा आहे. या प्रकरणी संजय जयस्वाल यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अशोक रोकडे, पोकॉं संजय गोरे करीत आहेत.

जुली मुख्य रस्त्यावर येऊन थबकली
चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी जुली नामक श्वानाने घटनास्थळापासून बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यापर्यंत चोरट्यांचा मागोवा घेतला. त्यानंतर जुली तेथेच थबकली. त्यामुळे चोरटे एखाद्या वाहनातून पसार झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे. या पथकात पीएसआय श्री. वाढई, नापोकॉं पद्मने, पोकॉं गवई यांचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 114 boxes of liquor from a deshi liquor store in buldana district