नोकरभरतीचा पुन्हा मुद्दा तापला, आठ दिवसांत शहानिशा करण्याचे जिल्हा बँकेला आदेश

16 director complaint about recruitment in district bank yavatmal
16 director complaint about recruitment in district bank yavatmal

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत बहुचर्चित नोकरभरतीचा मुद्दा पुन्हा तापला. 105 जागेच्या भरतीप्रक्रियेसंदर्भात 16 संचालकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची आठ दिवसांत शहानिशा करण्याचे आदेश बँक प्रशासनाला देण्यात आहेत. त्यामुळे आता या भरतीप्रक्रियेसंदर्भात तक्रारीची शहानिशा झाल्यानंतरच पुढच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालक मंडळाची पहिलीच बैठक मंगळवारी(ता.19) दुपारी एक वाजता अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत 23 विषय असले तरी सर्वांचे लक्ष नोकरभरतीच्या विषयाकडे लागले होते. भरतीप्रक्रियेचा विषय सर्वांत शेवटी घेण्यात आला. आरक्षणातील 42 जागा भरण्यासाठी भरतीप्रक्रिया राबविण्याचे निर्देश न्यायालयाचे आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आठ दिवसांत सुरू करण्याचे आदेश बँकेचे अध्यक्ष कोंगरे यांनी बँक प्रशासनाला दिले. जिल्हा बँकेने 147 पदांसाठी नोकरभरती प्रक्रिया राबविली होती. त्यातील 133 जागा लिपिकांच्या व 14 जागा शिपाई पदाच्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यातील 105 जागा भरण्यास परवानगी दिलेली आहे. त्याची प्रक्रियाही जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र, या भरतीप्रक्रियेवरच तब्बल 16 संचालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

प्रोसेडिंगवर स्वाक्षरी नसणे, उमेदवारांच्या स्वाक्षरी, अमरावती येथे घेण्यात आलेली परीक्षा, गुणदान, असे अनेक मुद्दे जुन्या तसेच अनुभवी संचालकांनी उपस्थित केले. यावर अध्यक्षांनी बँक प्रशासनाला सर्व मुद्दे व तक्रारीची शहानिशा करण्याचे आदेश दिले. शहानिशा झाल्यानंतर पुढच्या बैठकीत भरतीप्रक्रियेवर निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाचा अवमान होऊ नये, याची काळजी घेत कायदेतज्ज्ञांकडून याबाबत मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. त्यामुळे या भरतीप्रक्रियेबाबत काय निर्णय होणार, हे अजूनही अधांतरीच आहे. आरक्षणातील 42 जागा भरण्यासाठी आठ दिवसांत बैठक घेऊन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 105 जागेसंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने तूर्तास प्रक्रिया ही थांबण्याच्या स्थितीत आहे. नोकरभरतीच्या वेळी भाजपचा अध्यक्ष होता. त्यानंतर सत्तासमीकरण बदलले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे भरतीबाबत अनेक चर्चांना उधाण आलेले आहे. नोकरभरतीत झालेली 'उलाढाल' चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच आता या भरती प्रक्रियेबाबत काय निर्णय होणार, हे अधांतरीच आहे. या बैठकीला उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, संजय देरकर, संचालक मनीष पाटील, स्नेहल भाकरे, संजय देशमुख, स्मिता कदम, राजुदास जाधव, प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

आम्हाला कोणाचेही नुकसान करायचे नाही. संचालक व अनेकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यांची शहानिशा करण्याची मागणी संचालकांची आहे. त्यामुळे प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. सर्व शहानिशा झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. आरक्षित जागेसंदर्भात आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत.
-टिकाराम कोंगरे, अध्यक्ष, जिल्हा बँक, यवतमाळ. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com