esakal | अभिमानास्पद!  विदर्भातील तब्बल २१ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर.. कोण आहेत हे शूर योद्धे.. जाणून घ्या  
sakal

बोलून बातमी शोधा

21 police in vidarbh will get President medal read full story

पोलिस पदकांनी सन्मानित झालेल्या जवानांमध्ये नागपूर, अमरावती, चंद्रपूर, बल्लारपूर (जि. चंद्रपूर), अकोला आणि गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांचा समावेश आहे.

अभिमानास्पद!  विदर्भातील तब्बल २१ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर.. कोण आहेत हे शूर योद्धे.. जाणून घ्या  

sakal_logo
By
राजेंद्र मारोटकर

नागपूर:  पोलिस दलात सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या पोलिसांना दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर केले जाते. यावर्षीसुद्धा जिवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. यात विदर्भातील १९ पोलिसांचा समावेश आहे. तर, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन अधिकाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

पोलिस पदकांनी सन्मानित झालेल्या जवानांमध्ये नागपूर, अमरावती, चंद्रपूर, बल्लारपूर (जि. चंद्रपूर), अकोला आणि गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांचा समावेश आहे. त्यातही गडचिरोली जिल्ह्यातील १४ पोलिसांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले. नक्षलग्रस्त ऊगात विशेष शौर्य कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील १४ जणांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

हेही वाचा - तोडगा काढा : शेतकऱ्याने चक्क आमदारांचीच तहसीलदारांकडे केली तक्रार, वाचा काय आहे प्रकार

त्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, सहा. उपनिरीक्षक सुरेश कोवासे, पोलिस हवालदार रतिराम पोरेटी, राकेश हिचामी, पोलिस नाईक मनीष गोरले, प्रदीपकुमार गेडाम, शिपाई गोवर्धन वाढई, कैलास उसेंडी, कुमारशहा किरंगे, शिवलाल हिडको, राकेश नरोटे, वसंत तडवी, सुभाष उसेंडी व रामेश कोमिरे यांचा समावेश आहे. त्याचसोबत सीआरपीएफच्या ९ बटालियनचे राकेशकुमार श्रीवास्तव व १९१ बटालियनचे राकेशकुमार सक्सेना यांनाही पोलिस पदक जाहीर झाले.

नागपूर शहर पोलिस दलातील गुन्हेशाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप शर्मा पोलिस पदकाचे मानकरी ठरले आहेत. १९८२ मध्ये ते शिपाईपदी पोलिस दलात दाखल झाले. विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी सेवा बजावली. गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. अनेक महत्त्वपूर्ण, गूढ आणि गाजलेल्या प्रकरणांचा छडा लावण्याचे श्रेय त्यांना जाते. विशेष कामगिरीसाठी त्यांना वेळोवेळी पुरस्कृत करण्यात आले आहे. २००६ साली ‘ऑल इंडिया पोलिस ड्युटी मिट’मध्ये त्यांनी सहभाग नोंदविला. त्याच वर्षी ‘महाराष्ट्र पोलिस ड्युटी मिट’मध्ये ‘क्राईम ऑब्जर्व्हेशन’मध्ये सुवर्णपदक पटकावले. २०१२ मध्ये मानवाधिकार आयोग डिबेट स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. २०१८ मध्ये पोलीस महासंचालक पदकाचे ते मानकरी ठरले. ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी २७० हून अधिक बक्षीस आणि प्रशस्तीपत्र मिळविले आहे. सध्या ते गुन्हे शाखेत डिटेक्शन ब्रांच वाचक शाखेत क्राईम डेटा, विश्लेषणासह गुन्ह्यांसंबंधातील कामे हाताळत आहेत.

अमरावती येथे ग्रामीण पोलिस दलाच्या सायबर ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक वीरेंद्र श्रीकृष्ण चौबे यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. अमरावती पोलिस आयुक्तालयासह परिक्षेत्रातून या पुरस्कारासाठी निवड झालेले चौबे हे एकमेव अधिकारी आहेत. १९८५ साली ते यवतमाळ जिल्हा पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू झाले होते. १९९० ते ९६ मध्ये बडनेरा, १९९६ ते १९९९ मध्ये शहर वाहतूक शाखा, १९९९ ते २००५ गुन्हेशाखा, २००५ पासून स्थानिक गुन्हेशाखा (ग्रामीण), २००८ ते २०१७ मध्ये ते संगणक विभागात कार्यरत होते. २०१७ मध्ये चौबे यांची उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांच्याकडे ग्रामीणच्या सायबर ठाण्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली.

अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक असलेले विजय वासुदेव खर्चे यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाणार आहे. खर्चे हे पोलिस विभागात पोलिस शिपाई म्हणून रुजू झाले होते. त्यांनी रामदासपेठ, पातूर, बाळापूर, स्थानिक गुन्हे शाखा यांसह नागरी संरक्षण येथे सेवा दिली आहे. त्यांना यापूर्वी २०१६ मध्ये पोलिस महासंचालकांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

क्लिक करा - कास्तकारांनो जीवावर उदार होऊ नका! शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी.. पण काय आहे कारण..वाचा  

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत सहायक फौजदार जनार्दन देवाजी मोहुर्ले, तर बल्लारपूर येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश बरडे यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. जनार्दन मोहुर्ले यांनी आतापर्यंत पोलिस विभागात ३१ वर्षांची सेवा दिली आहे. सध्या ते चंद्रपूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. बल्लारपूर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक असलेले रमेश बरडे यांची ३३ वर्षांची सेवा झाली आहे. सायबर सेलमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.


संपादन - अथर्व महांकाळ 

loading image