दिलासा! कोरोना पॉझिटिव्ह असलेले 22 रुग्ण उपचारानंतर झाले कोरोना मुक्त

corona
corona

यवतमाळ : वैद्यकीय महाविद्यालयात भरती असलेल्या  व सुरुवातीला पॉझिटिव्ह रिपोर्टस आलेल्या 22 लोकांचा अहवाल दोन दिवसांत निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. बरे होऊन ते रुग्ण घरी परतल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
तर, नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे पॉझिटिव्ह निघालेला रुग्ण उमरखेड तालुक्‍यातील धानोरा साचलदेव येथील रहिवासी निघाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता.नऊ) सायंकाळी सात वाजता प्रशासनाला माहिती मिळताच कठोर पावले उचलत गाव सील करण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्यांपैकी शनिवारी 4 (ता.नऊ चार ) व रविवारी (ता.दहा) 18, असे दोन दिवसात 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह" आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाचे आणि आरोग्य विभागाचे विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 85 वरून 63 वर आली आहे. गत चार दिवसात वैद्यकीय महाविद्यालयाने एकूण 296 नमूने तपासणीकरिता पाठवले. यापैकी 224 नमूने प्राप्त झाले असून 221 निगेटिव्ह तर नेर येथील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. सद्यस्थितित 53 नमूने अप्राप्त आहेत. तर काही नमून्यांचे प्रॉपर निदान झाले नसल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. उमरखेडवरून 18 लोकांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करण्यात आले आहे. उमरखेड़ आणि महागाव येथून आणखी 15 लोकांचे संस्थात्मक विलागिकरण करण्यात येणार आहे.
उमरखेड तालुक्‍यातील धानोरा येथील 64 वर्षीय व्यक्ती माहूर तालुक्‍यातील मालवाडा येथे रहात असलेली मुलगी व जावयाच्या भेटीसाठी बुधवारी (ता.सहा) सकाळी दूध वाहतूक करणाऱ्या एका वाहनाने उमरखेडमार्गे धनोडापर्यंत गेला. पुढे पायदळ लांजीपर्यंत प्रवास केला आणि पुढे जावयाच्या दुचाकीने मालवाडा येथे पोहोचली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.सात) त्याला सर्दी, ताप, दम लागणे अशी लक्षणे दिसून आल्याने नातेवाइकांनी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधीक्षकांनी तपासणी करताच त्यास "कोविड केअर सेंटर'मध्ये दाखल केले. शुक्रवारी (ता.आठ) रुग्णाचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. शनिवारी (ता.नऊ) सायंकाळी सात वाजता सदर रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या घटनेची गंभीर दखल घेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने उमरखेड प्रशासनास याबाबत माहिती दिली. प्रशासनाने तत्काळ पावले उचलली. काही वेळातच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, ठाणेदार यांनी महसूल, पंचायत, आरोग्य, पोलिस यंत्रणेसह धानोरा गावात जाऊन गाव सील केले. आरोग्य यंत्रणा तीन दिवसात संपूर्ण गावाची तपासणी करणार असल्याची दवंडी देण्यात आली आहे. सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या सर्व शक्‍यता प्रशासनाकडून तपासल्या जात आहे. रुग्णाच्या संपर्कात आणखी किती लोक आले, याचाही शोध घेण्यात येत आहे.
तिघांना यवतमाळला हलविले
रुग्णाच्या कुटुंबांतील तीन व्यक्तींना यवतमाळ येथे पाठविण्यात आले. तर संपर्कात असणाऱ्या 45 जणांना गावातील शाळेत क्वॉरंटाइन करण्यात आले होते. रविवारी (ता.दहा) त्यांना मरसूळ येथील कोविड केअर सेंटरमध्ये आयसोलेट करण्यात आले. अतिसंपर्कातील तिघांना स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले. उमरखेड तालुका कोरोना मुक्त असताना माहूरमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
"त्या' रुग्णाची साखळी कोसदनीपर्यंत
माहूर तालुक्‍यात पॉझिटिव्ह रुग्णाची साखळी कोसदनीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोसदनीसह परिसरात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. उमरखेड ते जवळा एक दूध डेअरीची गाडी शेतकऱ्यांचे दूध संकलित करण्यासाठी येत होती. धनोडापर्यंत त्या व्यक्तीने वाहनाने प्रवास केला. मुलीच्या घरी माहूर तालुक्‍यातील मालवाडा येथे त्या व्यक्तीची प्रकृती बिघडली आणि आता पॉझिटिव्ह निघाला. त्या दूध डेअरीच्या वाहन चालकाच्या कुटुंबास आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व दूध संकलन करणाऱ्या व्यक्तींना तपासणीसाठी यवतमाळ येथे नेण्यात आले. कोसदनी येथील दूध डेअरी मालक व तेथे काम करणाऱ्यांना होम क्वॉरटांइन करण्यात आले. गावातील सर्व किराणा दुकाने सील करण्यात आली आहेत.
पाच नातेवाईक आयसोलेशन वॉर्डात उमरखेड तालुक्‍यातील धानोरा येथील व्यक्तीचा दुसरा जावई फुलसावंगी येथील रहिवासी आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीची मुलगी  माहेरहून (धानोरा)  30 एप्रिलला सासरी (फुलसावंगी) आली. फुलसावंगी येथील कुटुंबाचा पॉझिटिव्ह व्यक्तीसोबतच संपर्क झाला. त्यामुळे पुढील खबरदारी म्हणून फुलसावंगी येथील वैद्यकीय अधिकारी यांनी एकाच कुटुंबातील एकूण पाच लोकांना यवतमाळ येथे तपासणीसाठी आयसोलेशन वॉर्डात पाठविले. या घटना क्रमाने फुलसावंगीवासीयांची काळजी वाढली आहे.
ढाणकीत दोन दिवसाचा "जनता कर्फ्यू'
 येथून सात किलो मिटर अंतरावर धानोरा गाव आहे. ढाणकी शहरात चार मे रोजी खासगी रुग्णालयात त्या व्यक्तीने आपली प्रकृती दाखविली. काल रात्री अधिकाऱ्यांनी त्या डॉक्‍टरला होम क्वारंटाइन होण्यास सांगितले. गावात संसर्ग वाढू नये म्हणून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने दोन दिवस बंद ठेवत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. पॉझिटिव्ह व्यक्ती ढाणकीत ज्यांना ज्यांना भेटला त्यांना क्वॉरंटाइन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संपर्कातील महिला मांगकिन्हीत
कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या संपर्कात आलेली महिला माहेरी मांगकिन्ही येथे गेल्या दोन दिवसांपासून राहत होती. त्याच महिलेच्या पतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच गावात खळबळ उडाली. तालुका प्रशासनाने गावात सर्व खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या महिलेसह संपर्कात आलेल्या माहेरकडील पाच जणांची यवतमाळ येथे विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.
वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्‍याच्या कवठळ गावातील एका व्यक्तीला उपचारासाठी कारंजा येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले होते. परंतु त्यांना अकोला येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. जास्त खर्चामुळे अकोला येथे उपचार न करता गावी परत आणले. दुसऱ्या दिवशी पत्नी व मुलासह खासगी वाहन किरायाने करीत सावंगी येथील रुग्णालयात नेण्यात आले. भरती केल्यानंतर मुलगा त्यांच्या जवळ थांबला. तर पत्नी शुक्रवारी (ता.आठ) सायंकाळी मांगकिन्ही येथे माहेरी आली. रविवारी (ता.दहा) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा निरोप मांगकिन्हीत धडकला. गावात अलर्ट जाहीर करण्यात आला असून, ग्रामस्तरीय संनियंत्रण समिती तळ ठोकून आहे. घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली. सोबतच त्या महिलेसह पाच जणांना यवतमाळला विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले. याशिवाय संपर्कात आलेल्या इतर कुटुंबांना होमक्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com