अखेर वृद्ध महिलेच्या खुनाचा छडा लागला, २५ वर्षीय तरुणाला अटक

प्रदीप बहुरुपी
Thursday, 1 October 2020

वरुड तालुक्‍यातील वाई शेतशिवारात शेतामध्ये राहत असलेल्या 70 वर्षीय वृद्ध रमिया दलसू युवनाते हिच्या डोक्यावर जड हत्याराने मारून तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी कलावंती देवराव युवनाते (वय 37, रा. पेंडोनी, मध्य प्रदेश) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

वरुड(जि. अमरावती): तालुक्‍यातील वाई शेतशिवारात शेतामध्ये राहत असलेल्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गेल्या 20 दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी अखेर पोलिसांनी 25 वर्षीय संशयितास अटक केली. दारू दिली नाही म्हणून वृद्धेचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

तालुक्‍यातील वाई शेतशिवारात शेतामध्ये राहत असलेल्या 70 वर्षीय वृद्ध रमिया दलसू युवनाते हिच्या डोक्यावर जड हत्याराने मारून तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी कलावंती देवराव युवनाते (वय 37, रा. पेंडोनी, मध्य प्रदेश) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा - चिता रचली, साहित्य आणले अन्‌ तो जिवंत झाला,  सारेच अवाक् 

70 वर्षीय वृद्धेचा खून कोणी आणि कशासाठी केला? याबाबत तर्कवितर्क काढले जात असताना शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. विशेष म्हणजे, रमिया ही गेल्या अनेक दिवसांपासून दारूविक्रीचा व्यवसाय करीत होती. वाईसह परिसरातील मद्यपी सतत तिच्या झोपडीवर ये-जा करीत होते. त्यापैकी अमर कन्हय्या फरकडे (वय 25) हा सतत या वृद्ध महिलेला त्रास देत असल्यामुळे ती त्याला दारू देत नव्हती. घटनेच्या आदल्या दिवशीसुद्धा तो तिच्या झोपडीवर गेला आणि तिला दारूची मागणी केली. परंतु, तिने दारू दिली नाही. अखेर दारू देत नाही म्हणून अमरने शेजारीच असलेल्या दगडाने तिला मारण्यास सुरुवात केली आणि त्यातच तिचा अंत झाला. याप्रकरणी उत्तरीय तपासणीनंतर सदर वृद्ध महिलेचा मृत्यू दगडाने मारून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला आणि आजूबाजूच्या शेतातील नागरिकांकडून माहिती घेतली. 

हेही वाचा -  काय सांगता? विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी

केवळ दारूसाठी अमर फरकडे (वय 25, रा. पेंडोनी, ता. पांढूर्णा, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश)याने तिचा खून केल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून अमर हा फरार होता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्याच्या गावात जाऊन चौकशी केली असता तो काटोल बायपासवरील एका बार ऍण्ड रेस्टॉरेंटमध्ये कामावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काटोल गाठून त्याला ताब्यात घेतले. संशयित आरोपीकडून खून करण्यासाठी वापरण्यात आलेले दगड, रक्ताने माखलेले कपडे आणि इतर साहित्य जप्त केले असून त्याने खून केल्याची कबुलीसुद्धा दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर 

याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, ठाणेदार श्रीराम गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, लक्ष्मण साने, अतुल मस्के, चंद्रकांत केंद्रे, रत्नदीप वानखडे, पंकज गावंडे, पुंजाराम मेटकर करीत आहेत. संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय लेवरकर, शैलेश घुरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 years old arrested in old woman murder case in warud of amravati