यवतमाळमध्ये ३५० सार्वजनिक शौचालय, राज्यातील पहिलाच प्रयोग

चेतन देशमुख
Tuesday, 24 November 2020

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हाभरात आतापर्यंत जवळपास 47 हजार 264 शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे शौचालयाचा वापर अत्यल्प सुरू आहे.

यवतमाळ : राज्यातील एकमेव यवतमाळ जिल्हा परिषदेने गावपातळीवर सार्वजनिक शौचालय बांधकामाचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात तब्बल 344 सार्वजनिक शौचालय पूर्ण झाले आहेत. 98 शौचालयाचे काम प्रगतिपथावर असून काही प्रमाणात का होईना गावात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हाभरात आतापर्यंत जवळपास 47 हजार 264 शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे शौचालयाचा वापर अत्यल्प सुरू आहे. अशात यवतमाळ जिल्हा परिषदेने गावात सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा पातळीवर शौचालयाची नोंदणी करण्यात आली. यात एकूण 442 सार्वजनिक शौचालयाची नोंदणी करण्यात आली होती. गावातील सार्वजनिक शौचालयावर एकूण दोन लाख रूपये खर्च करण्याचे नियोजन होते. त्यातून 10 टक्‍के लोकवर्गणी आणि 90 टक्‍के निधी प्रशासनाने खर्च केला. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 344 शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात यवतमाळ जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. परिणामी, आता तरी नागरिक शौचालयाचा वापर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - आता बांबूच्या बाटलीने प्या पाणी, नैसर्गिक चवीसोबत...

यातील 98 शौचालयाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. येत्या काळात सार्वजनिक शौचालयाची नोंदणी पंचायत समितीस्तरावर करण्यात येणार आहे. आतापर्यंत स्वच्छ भारत मिशनकडे जवळपास 70 ते 80 सार्वजनिक शौचालयाची नोंदणी झाली असून, ही नोंदणी गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - अमरावती-चांदूररेल्वे मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर

आतापर्यंत आर्णी तालुक्‍यात 29, बाभूळगाव 18, दारव्हा 12, दिग्रस 24, घाटंजी 33, कळंब 12, केळापूर 28, महागाव 16, मारेगाव 19, नेर 28, पुसद 21, राळेगाव 29, उमरखेड 18, वणी 21, यवतमाळ 28, झरीजामणी आठ बांधकाम करण्यात आले आहे. 

हेही वाचा - विदर्भात पुन्हा थंडी जाणार पाऊस येणार, याच आठवड्यात दिला इशारा 

जिल्ह्यात वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालयांची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होईल. ग्रामीण भागातील सर्वांनीच शौचालयाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. शौचालयाचा वापर केल्यास रोगराईपासून दूर राहता येईल.
- मनोजकुमार चौधर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छ भारत मिशन.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 350 public toilet build in yavatmal