esakal | दुसऱ्या लाटेतही उद्योगांना फटका, अमरावतीमध्ये ५० टक्के उद्योगांना घरघर

बोलून बातमी शोधा

industries

दुसऱ्या लाटेतही उद्योगांना फटका, अमरावतीमध्ये ५० टक्के उद्योगांना घरघर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोना विषाणूंनी परत एकदा आपला हल्ला तीव्र केल्याने जिल्ह्यातील उद्योगांची अवस्था दयनीय झाली आहे. विभागीय मुख्यालयाचे ठिकाण असतानाही येथे गंभीर स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. सुमारे ५० टक्के उद्योग संकटात आले असून हीच स्थिती कायम राहिली तर भीषण परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना

आर्थिक परिस्थिती भक्कम नाही. सर्वांचे व्यवहार बॅंकेच्या भरवशावर सुरू आहे. कोरोना किती राहील हे कोणीच सांगू शकत नाही. जानेवारी व फेब्रुवारीत मार्केटमध्ये चांगलीच तेजी आली होती. पण पहिल्या लाटेत जे लोक कमकुवत झाले ते दुसऱ्या लाटेत संपण्यात जमा आहेत. तर जे सक्षम होते ते दुसऱ्या लाटेत कमकुवत झाले आहेत. लहान उद्योग तसेच स्वयंरोजगार करणारे मोठ्या संकटात आहेत.

शासनाने पैसे देऊ नये, पण कर्जावरील व्याजदर तसेच दोन वर्षांसाठी जीएसटीमध्ये सूट द्यावी, त्यामुळे तेजी-मंदी कमी होईल, उलाढाली वाढतील. व्याज कायमचे माफ न करता एका वर्षासाठी माफ करा. मात्र, शासन आर्थिक धोरण कसे राबविते यावर सर्वकाही अवलंबून असल्याचे उद्योजकांचे मत आहे. लॉकडाउनचा परिणाम वाहतूक, बाजारपेठ, कामगार अशा सर्वच घटकांवर होत आहे. कोरोना किती काळ राहणार हे कोणीच सांगू शकत नसल्याने अनिश्‍चितता कायम आहे.

हेही वाचा: गर्भवती मातांनो, कोरोना विषाणूंचा बाळाला धोका नाही; नियमाचं करा पालन

तरुणांमध्ये असुरक्षितता -

कार्पोरेटमध्ये "वर्क फ्रॉम होम'मुळे तरुणांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. आपल्याला ऑफिसमधून तर काढलेच, आता नोकरीतून कधीही काढू शकतात, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये ताणतणाव वाढला आहे.

फुड व फार्मासिटीकल इंडस्ट्री जोरात सुरू आहे. पण इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट इंडस्ट्री संकटात आहे. कारण सर्व मोठे प्रकल्प संबंधितांनी पुढे ढकलले आहेत. त्यामुळे बाजारातील देवाण-घेवाण मंदावली आहे. परिणामी उद्योजकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे.
-विजय जाधव, उद्योजक, अमरावती.
रडता येत नाही व हसताही येत नाही, अशी गंभीर स्थिती आहे. उद्योग सुरू आहेत, उत्पादन होत आहे, कामगारांना वेतन दिल्या जात आहे, पण बाजार बंद आहे. ग्राहकच नाही, असे किती दिवस चालणार याची कोणतीच शाश्‍वती नाही. त्यामुळे अतिशय वाईट स्थिती उद्योजकांची झाली आहे.
-अविनाश कानतुटे, उद्योजक, अमरावती.