
चंद्रपूर ः केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय उपजिविका मिशनअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यात सुरू आहे. यातून बचतगटांच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येते. चालू आर्थिक वर्षांत जिल्ह्यातील साडेपाच हजार उमेदच्या बचतगटांना शंभर कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. राज्यात कर्जवाटपात जिल्हा अव्वल आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड विहित मुदतीत करण्यास जिल्हा आघाडीवर आहे.
महिलांच्या सामाजिक, आर्थिक विकासाला दिशा देणारे अशी उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ओळख आहे. 2013 मध्ये या अभियानाची राज्यात सुरुवात करण्यात आली. केंद्रपुरस्कृत या अभियानाला केंद्र सरकार दरवर्षी 60 टक्के तर राज्य सरकार 40 टक्के निधी देते. आज राज्यभरात उमेद अभियानाच्या जवळपास पाच लाख बचतगट आहेत. ग्रामसंघ, प्रभागसंघ राज्यभर उभे आहेत.
जवळपास पन्नास लाखांहून अधिक महिला या अभियानाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जुळल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 17 हजार 500 बचतगट आहेत. उमेदशी जुळलेल्या बचतगटांना उद्योगक्षम बनविणे, त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देणे, खेळते भांडवल कर्ज रुपात देणे, उत्पादक संघ तयार करणे, त्यांना खेळते भांडवल देण्यात येते. या अभियानात महत्त्वाचे वित्तीय समावेशनचे काम करण्यात येते. या अंतर्गत वेगवेगळ्या बॅंकांतून बचतगटातील महिलांना कर्ज मिळवून देण्याचे काम केले जाते. यंदा पाच हजार 600 बचतगटांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला होते.
कर्जासाठी तब्बल सहा हजार 400 प्रस्ताव उमेदला प्राप्त झाले. त्यातून साडेपाच हजार बचतगटांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या बॅंकेतून शंभर कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. सर्वोधिक पतपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा राहिला आहे. त्यापाठोपाठ जिल्हा अग्रणी बॅंकेचा समावेश आहे. मिळालेल्या कर्जातून बचतगटांच्या महिला शेती कामे, छोटे-मोठे उद्योग, दुकाने यासह अन्य सुरू करू शकतात. उमेद अभियान सुरू झाल्यानंतर बचतगटांना महिलांना दरवर्षी छोट्या-मोठ्या उद्योगांसाठी कर्ज दिले जात आहे. घेतलेले कर्ज वेळेत परतफेड करण्यातही जिल्ह्यातील महिला आघाडीवर आहे. त्याची टक्केवारी 98.50 टक्के आहे. राज्यात कर्ज वेळेत परतफेड करणारा चंद्रपूर जिल्हा असल्याची ओळख आहे.
तारण न घेता कर्ज
बॅंक कर्ज घेताना विविध कागदपत्रे मागतात. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील उमेद अभियानाशी जुळलेल्या बचतगटांच्या शेकडो महिला वेळेत कर्जाची परतफेड गेल्या काही वर्षांत करीत आहेत. बचतगटांच्या या विश्वासावर तारण न घेता जिल्ह्यातील विविध बॅंका बचतगटांच्या महिलांना कर्ज देत आहेत.
बचतगटांच्या महिलांना विविध बॅंका पाच लाखापर्यंत कर्ज देऊ शकतात. मात्र, सध्या एक ते दीड लाखापर्यंतचे कर्ज मिळत आहे. मागीलवर्षी 87 कोटींचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करण्यात आले. यंदा 102 कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 94 कोटींचे कर्ज वाटप उमेद अभियानाशी जुळलेल्या बचतगटांना करण्यात आले. शिल्लक असलेले उद्दिष्ट लवकरच पूर्ण करू.
राहुल कर्डीले,
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.