
जिल्ह्यात कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने हत्तीपाय आजार असलेल्या रुग्णांना कीटवाटप व अंडवृद्धी रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील 16 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात आठ तालुक्यांत हत्तीपाय आजाराचे 598 रुग्ण व 222 अंडवृद्धी रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. संबंधित आठही तालुक्यांतील रुग्णांना हत्तीपाय विकृती व्यवस्थापन कीट वाटप करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागात प्रशिक्षण झाले आहे.
हेही वाचा - 'औषध निर्माण कंपनीत राणा दाम्पत्य लाटतंय फुकटचे श्रेय'
जिल्ह्यात कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने हत्तीपाय आजार असलेल्या रुग्णांना कीटवाटप व अंडवृद्धी रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. जिल्ह्यात 2008 ते 2013 दरम्यान हत्तीपाय निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर 2015, 2017 व 2019 असे दोन वर्षांनंतर सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, झरी जामणी, पांढरकवडा व घाटंजी या आठ तालुक्यांत हत्तीपाय आजाराचे रुग्ण आढळून आलेत. शिवाय 16 ते 31 ऑगस्ट 2020दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात हत्तीपायाचे 598 व अंडवृद्घीचे 222 रुग्ण आढळून आलेत. हत्तीपाय व अंडवृद्घी अशी गुंतागुंतीमुळे विकृती आलेल्या रुग्णांना पायाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अशा रुग्णांना हत्तीपाय विकृती व्यवस्थापन (मास्क ड्रग्ज ऍडमिनीस्ट्रेशन) कीटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात 598 कीट खरेदी करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - गृहिणींची चिंता वाढली! थंडीचा कडाका वाढल्याने टोमॅटो वगळता भाजीपाला वधारला
कीटचे वाटप व वापराबाबत मार्गदर्शन करण्यासंदर्भात शुक्रवारी (ता. एक) आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संघर्ष राठोड, साथरोगनिर्मूलन अधिकारी डॉ. संतोष मनवर यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते. येत्या मार्च महिन्यात या आठही तालुक्यांत गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे 222 अंडवृद्घी रुग्णांवर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मार्च 2021पर्यंत अंडवृद्घी शस्त्रक्रीयेचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुक्ष्म कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. पांढरकवडा येथे मंगळवारी व वणी येथे गुरुवारी शिबिरसुद्धा घेण्यात येणार आहे.
हेही वाचा - आता पर्यटकांसाठी ताडोबाचे आणखी एक प्रवेशद्वार सुरू,...
जिल्ह्यात 222 अंडवृद्घी रुग्णांची नोंद आहे. अंडवृद्घी शस्त्रक्रीयेचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. मार्चअखेर शस्त्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होईल. याशिवाय सर्वेक्षणातील रुग्ण सुटल्यास त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदी कराव्यात. विकृती व्यवस्थापन किटचा वापर योग्यरित्या व्हावा. मार्चअखेरपर्यंत यवतमाळ जिल्हा हत्तीरोगमुक्त होईल, यात दुमतच नाही.
- डॉ. हर्षल राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी, यवतमाळ.