काही तासांतच चार लाखांचे लोन मंजूर झाल्याचा आला फोन; सर्वकाही सुरळीत सुरू असताना पुन्हा खणखणला फोन

संतोष ताकपिरे
Wednesday, 27 January 2021

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उमेश कुबडे यांनी मोर्शी ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून नीता सिंग, नीरज गुप्तासह नोएडा उत्तर प्रदेश येथील फायनान्स कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अमरावती : चार लाख रुपयांचे लोन मंजूर झाल्याचे सांगून तोतयांनी एका व्यक्तीकडून तब्बल विविध कारणे सांगून ६३ हजार रुपये लुबाडले. उमेश बापुराव कुबडे (वय ४४, रा. तिरुपतीनगर, मोर्शी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्शी येथील कुबडे यांना १४ ऑक्‍टोबर २०२० रोजी एका अनोळखी व्यक्तीने फोन करून कर्जाच्या आवश्‍यकतेबाबत विचारणा केली. कर्ज हवे असल्याचे सांगताच विविध क्रमांकावरून संपर्क साधत वेगवेगळ्या पद्धतीने कर्ज घेतल्यास त्यावर विविध ऑफर उपलब्ध असल्याचीही बतावणी तोतयांनी संवाद साधताना केली.

ज्यांनी संपर्क साधला त्यांनी कुबडे यांना बॅंकेचा पत्ताही व्हॉट्‌सऍपवर पाठविला. त्यानंतर नीरज गुप्ता नामक व्यक्तीच्या व्हॉट्‌सऍपवर आधारकार्ड, बॅंकपासबुक व पॅनकार्ड कुबडे यांनी पाठविले. काही तासांतच चार लाखांचे लोन मंजूर झाल्याची माहिती तोतयांनी कुबडे यांना दिली. त्यानंतर एका बॅंकेचा अकाउंट नंबर कुबडे यांना पाठविला.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

तीन दिवसांनंतर नीता सिंग नामक महिलेने संपर्क साधून फाईल चार्ज, ऍग्रीमेंट चार्ज, जीएसटी, इन्शुरन्स चार्ज असे एकूण ६३ हजार रुपये दिलेल्या खातेक्रमांकावर भरण्यास सांगितले. ती रक्कम कुबडे यांनी ऑनलाइन पाठविली. त्यानंतर चार लाखांच्या कर्जासाठी विनंती केली असता अनोळखी व्यक्तींनी टाळाटाळ केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उमेश कुबडे यांनी मोर्शी ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून नीता सिंग, नीरज गुप्तासह नोएडा उत्तर प्रदेश येथील फायनान्स कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 63,000 fraud in the name of loan Amravati crime news