esakal | ३१ डिसेंबरला आठशे पोलिस रस्त्यावर, हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप
sakal

बोलून बातमी शोधा

800 police will be deployed on 31st december at amravati

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळपासून तर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत 80 पोलिस अधिकारी आणि सातशे पोलिस कर्मचारी रस्त्यावर पहारा देतील. 

३१ डिसेंबरला आठशे पोलिस रस्त्यावर, हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : नवीन वर्षाच्या आगमनाला अद्याप चौदा दिवसांचा अवधी असताना पोलिस प्रशासनाने नववर्षाचे स्वागत करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले.

हेही वाचा - कोरोना योद्धेच नाहीत लसीकरणासाठी तयार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी का केली नाही अद्याप नोंदणी?

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळपासून तर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत 80 पोलिस अधिकारी आणि सातशे पोलिस कर्मचारी रस्त्यावर पहारा देतील. संबंधित ठाण्यांच्या पोलिसांसह पूर्व व पश्‍चिम वाहतूक पोलिस, गुन्हेशाखा आणि आरसीपी पथक, क्‍यूआरटी व दामिनी पथके ठिकठिकाणी तसेच मुख्य चौकात तैनात दिसतील. कोणतेही व्यापारी प्रतिष्ठान रात्री दहानंतर उघडे ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. सर्वच आस्थापना, हॉटेल, बार त्यामुळे रात्री दहानंतर बंदच राहतील. वर्दळीच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेटिंग लावले जातील. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दुचाकी व कारचालकांची तपासणी करून अशा लोकांची ब्रिथ अनालायझर या उपकरणाद्वारे तपासणी करून गुन्हे दाखल केले जातील. खासकरून दुचाकीवर स्टंटबाजी, हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी आपल्या पद्धतीने समज देण्याची योजना आखली आहे. वेगात वाहन चालविणाऱ्यांची इंटरसेप्टर या अत्याधुनिक वाहनातील संयंत्राने तपासणी केली जाईल. पोलिस मुख्य रस्त्याने पायदळ, सायकलने व दुचाकीनेसुद्धा फिरतील. पोलिसांच्या वाहनांवरून पी. ए. सिस्टिमद्वारे सूचना दिली जाईल. 

हेही वाचा - अरेरे काम संपताच कोव्हिड योद्ध्यांची गच्छंती, ७५...

सर्वांनी नियमांचे पालन करावे -
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर हुल्लडबाजी करणे योग्य नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी पोलिस रस्त्यावर तैनात असतील. त्यामुळे नियमांचे पालन करून नव्या वर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाने नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केले. 

हेही वाचा - मास्क ठरतोय 'ऑलराऊंडर'; नियमित वापरामुळे...

उड्डाणपूल वाहतुकीस बंद -
आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता नवीन वर्षाचे स्वागत करताना इर्विन चौक ते राजापेठ व शिवाजीनगर ते पंचवटी चौकापर्यंत अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांकडून स्टंटबाजी केली जाते. त्यातून अपघाताची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे थर्टीफस्टला सर्वच उड्डाणपूल वाहतुकीस बंद राहतील.