esakal | भीषण! यवतमाळमधील तब्बल ८०० गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता; नद्या, नाले, बंधारे, तलाव कोरडे
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण! यवतमाळमधील तब्बल ८०० गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता; नद्या, नाले, बंधारे, तलाव कोरडे

भीषण! यवतमाळमधील तब्बल ८०० गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता; नद्या, नाले, बंधारे, तलाव कोरडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : उन्हाच्या कडाक्‍यासोबत जिल्ह्यातील टंचाईचे (Water Crisis) संकट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. तापमानामुळे नद्या, नाले, बंधारे, तलाव कोरडे पडले असून, प्रकल्पांतील जलपातळी (Water Level) खालावली आहे. जिल्ह्यात अनेक भागांत पिण्यासाठी पाणी मिळत नसून, अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ( 800 villages in Yavatmal may face water crisis problem)

हेही वाचा: सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट पसरवणाऱ्यांनो सावधान; आता सायबर सेलची तुमच्यावर असणार करडी नजर

अनेक भागांत टंचाईचे चटके बसू लागले असून, पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे. पाणीटंचाई निवारणार्थ यंदा प्रशासनाने साडेचार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. असे असले तरी नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु असे 102 प्रकल्प आहेत. त्यापैकी अनेक लघुप्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्हा परिषदेची तर तब्बल 213 जलाशये कोरडी पडली आहेत. तब्बल 14 गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून, नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 36 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आठशे गावांमध्ये पाणीटंचाईची शक्‍यता आहे. त्यानुसारच प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला. या गावांमध्ये विहीर अधिग्रहण, खोलीकरण, गाळ काढणे, झिरी घेणे, टॅंकरने पाणीपुरवठा, नळ योजना दुरुस्ती अशा अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. तीन टप्प्यांत आराखडा तयार करण्यात आला असून, पहिला टप्पा निरंक आहे. दुसऱ्या टप्प्यात काही गावांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

याशिवाय टॅंकर सुरू करण्यात आले. सध्या जिल्ह्यातील 14 गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात पुसद, आर्णी, यवतमाळ, कळंब तालुक्‍यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रकल्पातील जलसाठ्यात घट झाली असून लघुतलाव कोरडे पडले आहे. त्यांचा परिणाम आता पाणीपुरवठ्यावर होत आहे. नदी, नाले, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी खाली गेल्याने येणाऱ्या काळात टंचाई डोके वर काढणार का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा: हिंगणघाट जळीतकांड: बचाव पक्षाचे वकील पुन्हा गैरहजर; उलट तपासणीचे कार्य अपूर्णच

अधिग्रहणाचा आकडा 36 वर

जिल्ह्यात सध्या 36 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. त्यात आर्णी, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, बाभूळगाव, कळंब याठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येणाऱ्या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top