तहान लागली म्हणून शेतातील विहिरीजवळ गेलेल्या चिमुकल्याला दिसली तार.. अन् घडली मन हेलावून टाकणारी घटना 

प्रा. सदाशिव नरोटे 
Saturday, 29 August 2020

अकोला मुकिंदपूर पारधी बेडा येथील शेतशिवारात मुकिंदा मेश्राम यांच्या शेतात मजुरीसाठी मुकिंदपुर बेड्या येथील मजूर राजू पवार व त्यांची पत्नी गरिबशहा पवार हे गेलेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा नातू नयनसिंगदेखील गेलेला होता.

नेर (जि. यवतमाळ) :कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लहान मुलांच्या शाळा बंद आहेत. ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षणाची सोयही उपलब्ध नाही. म्हणूनच आई वडिलांना त्यांच्या मुलांना कामावर सोबत घेऊन जाण्याची वेळ आली आहे. पण यामुळेच यवतमाळ जिल्ह्यातील बेडा या गावी एक दुर्दैवी घटना घडली आहे. 

जाणून घ्या - बापरे! हवामान विभाग म्हणतो, आज मुसळधार पावसाची शक्यता

अकोला मुकिंदपूर पारधी बेडा येथील शेतशिवारात मुकिंदा मेश्राम यांच्या शेतात मजुरीसाठी मुकिंदपुर बेड्या येथील मजूर राजू पवार व त्यांची पत्नी गरिबशहा पवार हे गेलेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा नातू नयनसिंगदेखील गेलेला होता. दरम्यान, नयनसिंगला तहान लागल्याने तो शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला.

मात्र, शेताच्या धुऱ्याला लावलेल्या जिवंत विजेच्या तारांच्या कंपाउंडला नयनसिंगला स्पर्श झाला. शेतातील वीजतारांचा धक्का बसल्याने नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.27) संध्याकाळी पाचच्या सुमारास तालुक्‍यातील अकोला मुकिंदपूरमधील पारधी बेडा येथील शेतशिवारात घडली. नयनसिंग पवार असे मृत बालकाचे नाव आहे.

अधिक माहितीसाठी - तोंडातून सतत येते दुर्गंधी? हे उपाय करा आणि रहा फ्रेश.. वाचा सविस्तर

राजू पवार याने लगेच त्याला नेर येथील शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. राजू पवार यांनी याबाबत नेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शेतकरी मुकींदा मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नेर पोलिस करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 year old child is no more due to electric shock in farm