देहव्यापारातील आरोपींनी सांगितले खोटे नाव अन् खऱ्या चोखांद्रेंची उडाली झोप

विजय वानखेडे
Wednesday, 11 November 2020

आरोपीस अटक झाल्यावर त्याने पोलिसांना आपले नाव सुनील देवमन चोखांद्रे व त्याच्या पत्नीने स्वाती चोखांद्रे, असे नाव सांगितले. पोलिसांनी या नावाची शहानिशा न करता याच नावाने एफआयआर दाखल केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रसारमाध्यमातून ही बाब परिसरात पसरताच स्थानिक चोखांद्रे परिवारात खळबळ उडाली.

वाडी (जि. नागपूर): वाडीनजीक खडगाव मार्गावरील सोनबानगर जवळ गिट्टीखदान पोलिस हद्दीत असलेल्या साई-अर्चना निवासी संकुलात रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी देहव्यापार उघडकीस आणला. यामध्ये पती-पत्नी दोघांनाही अटक करण्यात आली. मात्र, त्यांनी खोटे नाव सांगितले आणि पोलिसांनी शहानिशा न करता त्याच नावाने गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी वृत्त प्रसिद्ध होताच, जे नाव सांगितले त्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली.  

हेही वाचा - खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १८ हजार कोटींची मदत

आरोपीस अटक झाल्यावर त्याने पोलिसांना आपले नाव सुनील देवमन चोखांद्रे व त्याच्या पत्नीने स्वाती चोखांद्रे, असे नाव सांगितले. पोलिसांनी या नावाची शहानिशा न करता याच नावाने एफआयआर दाखल केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रसारमाध्यमातून ही बाब परिसरात पसरताच स्थानिक चोखांद्रे परिवारात खळबळ उडाली. यामुळे नातेवाईकांनी चोखांद्रे परिवाराकडे चौकशी करणे सुरू केले. परिवारातील प्रमुख व्यक्तींनी सोमवारी या नावाचा शोध घेतला असता अशा नावाचे दुसरे पती-पत्नी अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने खोट्या नावाचा आधार घेऊन दिशाभूल केली  असल्याने  पोलिसांमध्ये गोंधळ उडाला. चोखांद्रे परिवारातील सदस्य संतप्त होऊन वाडी पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना लेखी निवेदन देऊन स्थिती स्पष्ट केली. दिशाभूल करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाईची मागणी लावून धरली.  या प्रकारामुळे चोखांद्रे परिवाराची बदनामी व मानसिक त्रास झाल्याचे सांगितले. भारत चोखांद्रे, महेश चोखांद्रे, सुमित चोखांद्रे, अमर चोखांद्रे यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी करून पोलिसांनी भविष्यात कारवाई करताना अधिक खबरदारी बाळगण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

हेही वाचा - ‘वॉश आउट’मध्ये चार दारूभट्ट्या उद्‌ध्वस्त; कारधा पोलिसांची कारवाई, सहा लाखांचा माल जप्त

ही बाब उघड होताच सोमवारी सकाळी आरोपीच्या मूळ गावी पथक पाठवून सत्य माहिती संकलित केली. आरोपीचे खरे नाव अमित जोगी असून दोघाही पती-पत्नीने खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे त्याच्यावर अधिकचा गुन्हा दाखल केला आहे. चोखांद्रे परिवारासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
-प्रदीप सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accused misleading with police in crime case at wadi of nagpur