esakal | Women's Day : ‘छपाक गर्ल’ची जगण्याची धडपड; 16 वर्षांनंतरही ‘ती’ दीनच
sakal

बोलून बातमी शोधा

acid attack.jpg

वेळ आणि रस्ता ठरलेला होता. मात्र, काळ पाठलाग करतोय याची कल्पनाही तिला नव्हती. 4 जानेवारी 2003 ची सकाळ तिच्या आयुष्याची संध्याकाळ ठरली. 

Women's Day : ‘छपाक गर्ल’ची जगण्याची धडपड; 16 वर्षांनंतरही ‘ती’ दीनच

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम : वाशीम शहरात 16 वर्षांपूर्वी सकाळीच ‘नमस्कार वाशीम’ चा आवाज शहराच्या परिचयाचा होता. ‘सिटी चॅनलवर’ वृत्तनिवेदिकेचे काम करणारी अर्चना शिंदे भरारी घेण्याचे स्वप्न पहात असताना दोन माथेफीरूंनी तिच्यावर ॲसिड हल्ला केला. शरीराबरोबर स्वप्नांची राखरांगोळी झाली. गेल्या 16 वर्षांत प्रत्येक महिलादिनी तिच्याबाबतच्या संवेदनांचा बाजार भरतो. मात्र, अर्चना शिंदेचा जगण्यासाठीचा संघर्ष कायम आहे. किमान जगण्यापुरतीतरी नोकरी मिळावी, यासाठीच्या अर्जाचे गठ्ठे तयार झाले आहेत. मात्र, संवेदनाच बोथट झाल्याने त्या फक्त महिला दिनासाठीच्या बाजारातील तात्पुरता उमाळा ठरत आहेत.

वाशीम शहरात 16 वर्षांपूर्वी अर्चना शिंदे नावाची सुस्वरूप युवती सिटी चॅनलवर वृत्तनिवेदीकेचे काम करीत होती. त्यामुळे तिचा चेहरा जिल्ह्यात सर्वांच्याच परिचयाचा होता. इतर मुलींसारखे तिचेही अधिकारी होण्याचे स्वप्न होते. वृत्तनिवेदनाचे काम करीत असताना तिला पोलिस भरतीचा कॉलही आला होता. त्या उत्साहात ती रोज सकाळी साडेपाच वाजता सराव करीत होती. वेळ आणि रस्ता ठरलेला होता. मात्र, काळ पाठलाग करतोय याची कल्पनाही तिला नव्हती. 4 जानेवारी 2003 ची सकाळ तिच्या आयुष्याची संध्याकाळ ठरली. 

हेही वाचा - आश्‍चर्यम! घोडीने दिला गाढवाला जन्म


एकतर्फी प्रेमातून दोन माथेफीरूंनी तिच्यावर ॲसिड हल्ला केला. सुंदर अर्चना या माथेफिरूंच्या मानसिक विकृतीत होरपळली गेली. वय वर्षे 19 मात्र, वाट्याला आलेली वेदना आभाळा ऐव्हढी झाली. वडिल रोज मजुरी करणारे मात्र, तरीही मुंबई पर्यंत उपचार करून तिचा जीव वाचला. जीव जरी वाचला असता तरी विकृतीने दिलेले कुरूपण कायम राहिले. या कुरूपपणाचा बाऊ न करता तिने कॉम्प्युटर टायपिंग, शिकवणी घेऊन उदरनिर्वाह सुरूच ठेवला. त्यानंतर घराच्या समोर एक छोटेखानी किराणा मालाचे दुकान सुरू केले. या छोट्या दुकानावरच गेल्या 16 वर्षांपासून ही युवती आपल्या कुटुंबाचा भार पेलत आहे. 

या दरम्यान तिच्यावर ॲसिड हल्ला झाला तेव्हापासून अनेकांनी आश्‍वासने दिली. अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या. मात्र, त्या कोरड्या राहिल्या आहेत. कायम अपंगत्व आलेल्या या युवतीने आतापर्यंत नोकरीसाठी अनेक अर्ज विनंत्या केल्या मात्र, याची दखल कोणीही घेतली नाही. कायमस्वरुपी नाही, निदान पोटाला भाकर मिळावी इतपत कंत्राटींचा होईना, असे काम करण्यास ती तयार आहे. मात्र, शासन दरबारी तिची 15 वर्षांची साधना कायम दुर्लक्षित राहत आहे. महिला दिनानिमित्त मोठ मोठ्या घोषणा केल्या जातात महिला सबलीकरणाचे नारे दिले जातात. मात्र, या वेदनेवर फुंकर घालायची कुणी हा प्रश्‍न भाकरी ऐव्हढा होऊन तिच्याच अंगावर आदळतो. ती पुन्हा पुन्हा दुर्लक्षित होते. आम्हीही बोथट झालेल्या संवेदना पाजळत बसतो.

सरकार दरबारी अनेक वेळा अर्ज
16 वर्षांपूर्वी डोळ्यातील स्वप्न एकाएकी राख झाले. गेल्या 16 वर्षांत वेदना सोसत वाटचाल सुरू आहे. वडिलांचे वय 79 तर आईचे वय 69 वर्षे आहे. यावयात त्यांना माझ्या मदतीला उभे राहवे लागते. याबाबत सरकार दरबारी अनेक वेळा अर्ज, विनंत्या केल्या परंतु माझी दखल कुणीही घेतली नाही.
-अर्चना शिंदे, पीडित युवती, वाशीम