प्रशासनाची तारांबळः "कोरोना'चा मेटॅडोर थेट मुंबईवरून घराच्या दारात ! 

file photo
file photo

पुसद (यवतमाळ) : "कोरोनाची वरात आलिया दारात' हे थेट मुंबईवरून लपूनछपून निघालेल्या एका मेटॅडोरने खरे ठरविले. पुसद तालुक्‍यातील हुडी, निंबी, दिग्रस तालुक्‍यातील इसापूर, रुई तलाव, महागाव तालुक्‍यातील माळकिन्ही व उमरखेड तालुक्‍यातील पारडी, वाणगाव या गावांमध्ये एकूण 17 जण मंगळवारच्या रात्रीतून उतरले खरे. परंतु, लगेचच दोन दिवसांत कोरोना पाहुण्यांमुळे या गावांची रयाच गेली. कोरोनामुक्त असलेला पुसद उपविभागातील ग्रामीण परिसर अवघ्या काही वेळात कोरोनामय बनला. या मेटॅडोरमधील 11 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासनाची आणि ग्रामीण लोकांची अक्षरशः झोपच उडाली आहे. 

दक्षता समितीची नवागतांवर करडी नजर 

राज्यात स्थलांतरणाला मुभा मिळाल्यानंतर मुंबई, ठाणे, भिवंडी, पुणे यासारख्या कोरोनाबाधित रेडझोन असलेल्या क्षेत्रातून लोक आपल्या गावाकडे परतू लागले. यात विशेषतः रोजगारासाठी गेलेल्या मजूर वर्गाचा मोठ्याप्रमाणावर समावेश आहे. जवळजवळ दोन महिने 'लॉकडाऊन'मध्ये ग्रामीण परिसर कोरोनामुक्त राहिला. गावातील दक्षता समितीची बाहेरून येणाऱ्या नवागतांवर करडी नजर होती. पुसद तालुक्‍यातील माळपठारावरील बाहेर गेलेले मजूर मोठ्याप्रमाणावर आपापल्या गावात परतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले. काहीवेळा या मंडळींनी गावात उच्छाद मांडला. परंतु, प्रशासनाच्या कारवाईच्या धाकामुळे त्यांना आवर घालता आला. 

'लॉकडाऊन'च्या तिसऱ्या टप्प्यात मुंबई, पुणे परिसर कोरोनाचा 'हॉटस्पॉट'बनला. कोरोनाचा फैलाव वाढला. त्यातच स्थलांतरणाचा परवाना मिळाल्याने 'शहराकडून गावाकडे' मिळेल त्या वाहनाने निघण्यासाठी लोकांची जणू रीघ लागली आणि शेवटी नको ते झालेच. मुंबईवरून पोचलेल्या एका मेटाडोरमुळे हुडी, निंबी, इसापूर, रुई तलाव, मांगकिन्ही या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. 14 मे रोजी रात्री निंबी येथे चार, हुडी येथे चार जण उतरवीत, दिग्रस, महागाव व उमरखेड या तालुक्‍यांतील गावांमध्ये या प्रवाशांना रात्रीतून सोडण्यात आले. ते एकाच समाजाचे व नातेवाईक असल्याने पवई मुंबईतून सोबत आले होते. विशेष म्हणजे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नव्हती. 

गावात पंधरा वर्षानंतर परतला 

मुंबई येथे हिरानंदानी अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक असलेला मूळ हुडीचा रहिवासी गावात पंधरा वर्षानंतर परतल्यावर 15 रोजी सहजच त्याची 'गावखुशाली'झाली. परंतु, ताप व खोकला ही लक्षणे असल्याने पती, पत्नी व मुलगा गावातील ऑटोरिक्षाद्वारे उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्या व्यक्तीला पुसद येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. दरम्यान, लक्षणे कायम असल्याने ता.17 मे रोजी त्याला यवतमाळ जिल्हा रुग्णालयात रात्री रेफर करण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले. त्याची पत्नी, मुलगा, ऑटोचालक हे सर्व पॉझिटिव्ह आल्याने धाकधूक अधिक वाढली. दरम्यान, हुडीसह निंबी, इसापूर, रुई तलाव, मांगकिन्ही येथील 11 लोक पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली व यवतमाळच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. 

मेटॅडोरने दिला धक्का 

हुडी येथील कोरोनाबाधित 51 तास उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षात असल्याने त्यांचा संपर्क वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची आला. या पती-पत्नीचे अहवाल पॉझिटिव्ह येताच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आम्हाला होम क्वारंटाईन करावे, अशी मागणी केली व एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे डोळ्यात तेल घालून कोरोनाच्या विरुद्ध लढणारी यंत्रणा मुंबईवरून थेट कोरोना दारात आल्याने खजील झाली. आता या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या असून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनावर मोठे दडपण आहे. कोरोना आपल्यापासून दूर आहे, म्हणून मनमौजी लोकांनाही या कोरोना मेटॅडोरने धक्का दिला आहे, एवढे नक्की ! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com