esakal | तहानलेल्या शेतांना दिला आषाढसरींनी दिलासा... 
sakal

बोलून बातमी शोधा

Dhan Parhe

आषाढसरी जोमाने बरसाव्यात अशी विनवणी शेतकरी आकाशाकडे बघून करीत होते. अखेर शुक्रवारी या आषाढसरी बरसल्या. मागील काही दिवसांपासून वातावरण ढगाळ होते. कधी लख्ख ऊन पडून उष्णताही वाढत होती. या पावसामुळे वातावरणातील उष्मा कमी होऊन पऱ्ह्यांना तजेला मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

तहानलेल्या शेतांना दिला आषाढसरींनी दिलासा... 

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : यंदा पावसाचा जोर तसा कमीच असला, तरी काही दिवसांची गैरहजेरी लावून आषाढसरी शुक्रवारी (ता. 10) पहाटेपासून हजर झाल्याने तहानलेल्या शेतांना दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी धानपऱ्ह्यांचे कोमेजणे सुरू झाले होते. पण या पावसाने त्यांना काही प्रमाणात संजीवनी मिळाल्याचे दिसून येत आहे. 

यंदा मृगाच्या पावसाने फारशी कामगिरी केली नाही. पहिल्याच चेंडूत त्रिफळा उडालेल्या फलंदाजाप्रमाणे हे नक्षत्र शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणून आकाशाच्या पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर आर्द्रा व नुकत्याच गेलेल्या पुनर्वसू नक्षत्रानेही फारशी कामगिरी केली नाही. आषाढ मास प्रारंभ झाल्यानंतरही पावसाला जोर नसल्याने शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हे कोमजण्याच्या व करपण्याच्या स्थितीत आले होते. खरेतर आर्द्रा नक्षत्रात भरपूर पाऊस असतो. पण, यंदा पावसाने जरा अढीच दिली आहे.

अवश्य वाचा- ताई थांब जाऊ नको.... स्वराजची शेवटची आर्त हाक 

आषाढसरी जोमाने बरसाव्यात अशी विनवणी शेतकरी आकाशाकडे बघून करीत होते. अखेर शुक्रवारी या आषाढसरी बरसल्या. मागील काही दिवसांपासून वातावरण ढगाळ होते. कधी लख्ख ऊन पडून उष्णताही वाढत होती. या पावसामुळे वातावरणातील उष्मा कमी होऊन पऱ्ह्यांना तजेला मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. गडचिरोली हा धानशेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्यात खरीप हंगामाला अतिशय महत्त्व आहे. शिवाय जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. असाच पाऊस अनेकदा धोका देत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. 

अवश्य पहा-  Video : `बसंती`साठी विरू चढला टॉवरवर....

चिंतेचे ढग दाटले... 

आकाशात काळेभोर ढग दिसत असले, तरी ते फारसे कोसळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग दाटून आले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यंदा तेंदू हंगामही फारसा होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोसळले आहे. त्यात पाऊस लहरीपणा करत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. 

संपादन - राजेंद्र मारोटकर