अजित पवार म्हणाले, विदर्भात राष्ट्रवादीचा करणार विस्तार 

वीरेंद्रकुमार जोगी
Wednesday, 18 December 2019

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. महाआघाडी सरकारच्या आगामी धोरणांविषयीची माहिती कार्यकर्त्यांना देताना युती सरकारच्या कार्यकाळात घेतलेले शेतकरीविरोधी निर्णय रद्द करणार असून शेती समृद्धी व रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

नागपूर : पश्‍चिम महाराष्ट्रवादी पार्टी हा ठपका पुसून काढण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भात विस्तार करण्याचे ठरविले आहे. यासाठी आपण जातीने लक्ष देणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूतोवाच केले. मंगळवारी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कॉंग्रेसची अचानक बैठक घेतली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

विदर्भातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा आमदार निवडून आले आहेत. याचा फायदा घेतला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांनी देखील राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. भाजपची सत्ता स्थापनेची धडपड सुरू असताना शरद पवार यांनी दोन दिवस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सांत्वन केले. जे कोणी काही कारणांमुळे पक्षापासून दुरावले त्यांनाही पुन्हा जोडण्यात येणार आहे. पवारांचे वारंवार होणारे दौरे बघता आता राष्ट्रवादीचे टार्गेट विदर्भ असल्याचे मानले जात आहे. 

हेही वाचा - महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार

मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी राष्ट्रवादीची विदर्भात चांगली कामगिरी झाली आहे. अजित पवार स्वत: जातीने लक्ष घालणार आहेत. जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

क्लिक करा - #NagpurWinterSession : सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला : फडणवीस

महाआघाडी सरकारच्या आगामी धोरणांविषयीची माहिती कार्यकर्त्यांना देताना युती सरकारच्या कार्यकाळात घेतलेले शेतकरीविरोधी निर्णय रद्द करणार असून शेती समृद्धी व रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेशचंद्र बंग, मधुकर कुकडे, निरीक्षक धनंजय दलाल, शब्बीर विद्रोही, विजय घोडमारे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar said, NCP will expand in Vidarbha