हे शहर ठरतेय हॉटस्पॉट, 14 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या गेली दीडशेवर

akola city is becoming a hotspot, 14 patients have died, the number of patients has gone up to 150
akola city is becoming a hotspot, 14 patients have died, the number of patients has gone up to 150

अकोला : सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अकोला जिल्ह्यात सुद्धा धुमाकूळ घातला आहे. अमरावती महसूल विभागात समावेश असलेल्या अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांना मागे टाकत अकोला जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

कोरोना अकोला जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता. ११) कोरोना विषाणूमुळे १४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १५९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची अकोला महानगरात संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक शहर कन्टेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम करणारे पोलीस व आरोग्य कर्मचारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. परिणामी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

अमरावती महसूल विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा वगळता अकोला जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. अकोला महानगर पुरतेच मर्यादित न राहता कोरोनाने आता ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा आपल्या विळख्यात घेण्यास सुरूवात केली आहे. परिणामी अकोला जिल्ह्यातील अंत्री मलकापूर, उगवा, कंचनपूर इत्यादी गावांमध्ये सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. संबंधित रुग्णांच्या संपर्कातील ५० वर नागरिक हे अतितीव्र जोखमीचे असल्याने व संबंधितांच्या कोरोना तपासणीचे अहवाल प्रलंबित असल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पॉझिटिव्ह अधिक डिस्चार्ज कमी
अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. कोरोनाग्रस्त आढळलेल्या दीडशेवर रुग्णांपैकी आतापर्यंत केवळ १४ रुग्णांना अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. संबंधितांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु अकोला वगळता इतर जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रविवार (ता. १०) पर्यंत अमरावती जिल्ह्यातून २१, बुलडाण्यातून २३, यवतमाळ मधून ३२ व वाशिम मधून एक रुग्ण कोरोना मुक्त झाल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले. सदर आकडेवारीवरून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात कोरोनावर विजय मिळवण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना बळींची संख्या ही अधिक
अमरावती महसूल विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा अधिक आहे. सोमवार (ता. ११) पर्यंत अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे १४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अमरावतीमध्ये १२ बुलडाणा, वाशिममध्ये प्रत्येकी १-१ व यवतमाळमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याची माहिती आहे.

रुग्णसंख्या दीडशे पार
अकोला जिल्ह्यात सोमवारपर्यंत १५९ कोरोना बाधित रुग्ण आढळले. अमरावती जिल्ह्यात ७८, बुलडाणामध्ये २४, यवतमाळ ९६ व वाशिममध्ये ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सुद्धा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्याची आघाडी दिसून येत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांतमध्ये वाढ
अकोला महापालिका परिसरातील बैदपुरा, अकोट फाइल, सिंधी कॅम्प, कृषी नगर, खैर मोहम्मद प्लॉट, मेहरे नगर डाबकी रोड, कमला नगर वाशिम बायपास, सुधीर कॉलनी, शिवर, शिवनी, न्यू राधाकिसन प्लॉट, माळीपुरा, भीम नगर, अगर वेस, जुना आळशी प्लॉट, भवानी पेठ, अक्कलकोट हरिहर पेठ, बापू नगर अकोट फाइल, रामनगर म्हाडा कॉलनी, गुलजार पुरा, भवानी पेठ तार फाईल व आझाद कॉलनी सह मोठी उमरी, आंबेडकर नगर, जुने शहर अगरवेस परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com