मुख्यमंत्र्यांचे दहा हजाराचे आदेश हवेतच !

याेगेश फरपट
मंगळवार, 18 जुलै 2017

शेतकरी हेल्पलाईनही निरूत्तरीच ! 
शासनाने कर्जप्रकरणाबाबत काेणतीही तक्रार असल्यास १८००२३३०२४४ या शेतकरी हेल्पलाईनवर फाेन लावला असता, काॅल उचलल्या जात नाही. ‘सॉरी, यूवर काॅल कॅन नॉट बी कनेक्टेड’ अशा प्रकारचा मॅसेज येताे.

अकाेला - आधीच विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने हुलकावणी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मुदतवाढ दिलेले अग्रीम दहा हजार रुपये तातडीचे कर्ज वितरणाचे आदेश साेमवारी संध्याकाळपर्यंत बँकापर्यंत पाेहोचले नाहीत. त्यामुळे माेठ्या अपेक्षेने बॅंकेत गेलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा निराशाच आली आहे.

‘सकाळ’चमूने केलेल्या पाहणीत हे वास्तव समाेर आले. दरदिवसाला कर्जमाफीबाबतचे नवनवीन निकष येत आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहे. १ एप्रिल २०१२ पासून घेतलले कर्ज आणि ३० जून २०१६ अखेर थकीत असलेल्या शेतकऱ्यांना बॅंकांच्या धोरणानुसार कर्ज मिळू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्‍यक असणाऱ्या गोष्टींसाठी (खते, बी-बियाणे आदी) निधी उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी १० हजार रुपये मर्यादेपर्यंत शासन हमीवर तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घाेषणा २० जून राेजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र मध्यंतरी राज्यभर शेतकरी आंदाेलने झाल्याने बँकांनी हे कर्ज वितरण थांबवले. त्यात १४ जुलै राेजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार रूपये तातडीच्या कर्जाला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देवून थकबाकीदार शेतकऱ्यांनी या याेजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

याबाबबचा शासननिर्णय सुद्धा सहकार, पणन व वस्त्राेद्याेग विभागाने शुक्रवारी (ता.१४) जाहिर केला. प्रत्यक्षात मात्र बॅंक अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवत आम्हाला याबाबतचे काेणतेही आदेश नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची ही याेजना सुद्धा वांध्यात सापडली आहे. 

काय म्हणाला अधिकारी ? 
सन २०१५ मध्ये पीक कर्ज घेतलेला एक शेतकरी गांधी राेडवरील महाराष्ट्र बॅंकेत दुपारी १ वाजता गेला. काऊंटवर चौकशी केल्यानंतर तुम्ही (नाव न सांगता) समाेर बसलेल्या साहेबांकडे चौकशीला जा असे सांगितले. संबधीत शेतकऱ्याने आपला खातेक्रमांक सांगितल्यानंतर त्याने संगणकप्रणालीवर शाेधाशाेध सूरू केली. त्याला काही सापडेना. शेवटी त्याने तुम्ही कॅबीनमधील साहेबांना भेटा. 

मॅनेजर व शेतकऱ्यामधील संवाद 
शेतकरी - साहेब मला पेरणीसाठी दहा हजार रूपयाची नितांत अावश्यकता आहे. 
मॅनेजर - आमच्या बॅंकेत तर शेतकऱ्याचे खातेच नाही. तुमचे कसे. 
शेतकरी - आहे न साहेब, पहा न जरा. खुप अर्जंट हाेते, पेरणीसाठी पैसा नाही. 
मॅनेजनर - बसा, अकाऊंट नंबर सांगा. मला आदेशाबाबत माहिती नाही. पण माेठ्या साहेबांना विचारताे (असे म्हणत माेबाईलवर संभाषण झाले) तुम्हाला नाही मिळू शकणार दहा हजार रूपये. 
शेतकरी - का साहेब. 
मॅनेजर - तुम्ही एक काम करा. सातव चौकातील आमच्या झाेनल बॅंकेतील माेघे साहेबांना भेटा. 
शेतकरी - आेके साहेब. धन्यवाद 

शेतकरी हेल्पलाईनही निरूत्तरीच ! 
शासनाने कर्जप्रकरणाबाबत काेणतीही तक्रार असल्यास १८००२३३०२४४ या शेतकरी हेल्पलाईनवर फाेन लावला असता, काॅल उचलल्या जात नाही. ‘सॉरी, यूवर काॅल कॅन नॉट बी कनेक्टेड’ अशा प्रकारचा मॅसेज येताे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Akola news farmer help Devendra Fadnavis