कोरोनाने सर्व धंदे बुडाले, मात्र चोरट्यांच्या धंद्याला आली तेजी... वाचा कसे ते 

संतोष ताकपिरे 
Monday, 20 July 2020

संबंधित महिलेला प्रथम कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. त्यामुळे 12 जुलैपासून तिच्या घराला कुलूप होते. बंद घर चोरट्यांच्या नजरेतून सुटणार तरी कसे? त्यांनी याच संधीचा फायदा घेतला. 

अमरावती : संपूर्ण जगाला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाभयंकर अशा कोरोना विषाणूची एका महिलेला लागण झाली. त्यामुळे त्या महिलेवर अमरावती शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती वलगाव येथील रहिवासी आहे. महिला अमरावतीत उपचार घेत असल्याने तिच्या घराला कुलूप लागले आहे. याचाच फायदा चोरट्यांनी घेऊन तिच्या बंद घरावर रात्रीच्या सुमारास डल्ला मारला. चोरट्यांनी तिच्या घरातून 98 हजार 50 रुपयांचा ऐवज लंपास केला. महिलेच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

संबंधित महिलेला प्रथम कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. त्यामुळे 12 जुलैपासून तिच्या घराला कुलूप होते. बंद घर चोरट्यांच्या नजरेतून सुटणार तरी कसे? त्यांनी याच संधीचा फायदा घेतला आणि रात्रीच्या सुमारास तिच्या घरात शिरले. घराला कुलूप असल्याने चोरट्यांनी संपूर्ण घरच पिंजून काढले. 

अवश्य वाचा- अबे, मंगळवारपासून श्रावण लागते ना, मंग मारनं ताव चिकन-मटणावर...

चोरट्यांनी घरातून प्रत्येकी 10 ग्रॅमचे दोन मंगळसूत्र, दीड ग्रॅमचे सोन्याचे मणी, सहा ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि चांदीच्या दागिन्यांसह साडेसात हजारांची रोख रक्कम असा एकूण 98 हजार 50 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची माहिती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेला शेजाऱ्यांनी दिली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरट्यांनी तेलीपुरा, वलगाव येथील घरफोडी करताना चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येते. 

अवश्य वाचा- `तो` देखणा तर `ती` सौंदर्यवान, आले आज सर्वाधिक जवळ...

जाफरजीन प्लॉटमध्ये गोदाम फोडले 

शहरातील जाफरजीन प्लॉट परिसरात अजय ईश्वरदास लाठी यांचे दुर्गा ट्रेडिंग कंपनी नावाचे गोदाम आहे. चोरट्यांनी ते फोडून 73 हजार 631 रुपयांच्या खाद्य तेलासह विजेच्या मोटारी असा एकूण 93 हजार 631 रुपयांचा ऐवज लंपास केला. लाठी यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All trades are in Recession, but thieves' business gained momentum