आई उदे गं अंबाबाई!; दिवाळीचा साजश्रुंगार; आठ महिन्यांनी उघडली मंदिराची दारे

Amravati ambabai temple reopen after 8 months
Amravati ambabai temple reopen after 8 months

अमरावती ः विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी तसेच एकवीरा देवीच्या दर्शनाने अमरावतीकरांची आजची पहाट उजाडली. कोरोनाच्या गडद छायेत मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले अंबा, एकवीरा देवी तसेच अन्य मंदिरे सोमवारपासून (ता.16) उघडण्यात आल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकू लागली आहे.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आल्यानंतर आठ महिन्यांपूर्वी मंदिरेसुद्धा बंद करण्यात आली होती. आता हळूहळू कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने शासनाने सर्वच क्षेत्र अनलॉक केले आहे. मंदिरांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता दिवाळीत भाविकांची ही इच्छासुद्धा पूर्ण झाली आहे. विदर्भाची कुलस्वामिनी असलेली अंबा व एकवीरा देवीची प्रवेशद्वारे सोमवारी उघडण्यात आली. 

विशेष म्हणजे ऐन दिवाळीत शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली असून दिवाळीचा साजश्रुंगार देवीला करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी देवीच्या मूर्तीचा साजश्रुंगार करण्यात आला होता. अंबादेवी तसेच एकवीरा देवीत सोमवारी नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाचला अभिषेक, पातळ दागिने परिधान करणे, शाश्‍वत पूजा, दुपारी नैवेद्य तसेच रात्री आठ वाजता महाआरती अशी दिनचर्या होती.

अंबादेवीत अशी राहील दर्शनाची व्यवस्था

मंदिर हे सकाळी 6 ते 11.30, दुपारी 12 ते 5 तसेच सायंकाळी 5.30 ते 8 या वेळेत दर्शनासाठी उघडे राहील. 11.30 ते 12 तसेच 5 ते 5.30 या वेळेत मंदिर सॅनिटायझेशन करण्यात येईल. रात्री आठ नंतर मंदिराचे प्रवेशद्वार बंद होईल.
थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स, मास्क आदी दक्षता घेणे हे धार्मिक स्थळाचे व्यवस्थापक, पुजारी, कर्मचारी, सेवेकरी, अभ्यागत व भाविकांवर बंधनकारक राहील. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था असावी. भाविकांना पादत्राणे प्रार्थनास्थळाच्या आवारात न आणता वाहनात ठेवण्यास प्रवृत्त करावे किंवा सोशल डिस्टन्स राखले जाईल, अशी व्यवस्था व्हावी.

नो मास्क, नो एन्ट्री

प्रार्थनास्थळे किंवा परिसरात कुठेही गर्दी होता कामानये. परिसरातील पूजा, प्रसाद, चहा, धार्मिक ग्रंथविक्री दुकाने आदी दुकानांतही सोशल डिस्टन्स ठेवले जाईल याची काळजी घ्यावी. धार्मिकस्थळी प्रार्थना संगीत वाजवता येईल, मात्र बाहेरून संगीतवृंद आणण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रार्थनेसाठी भाविकांनी सार्वजनिक चटईचा वापर करू नये, स्वतःची स्वतंत्र चटई सोबत आणावी. प्रसाद, तीर्थवाटप करू नये. अन्नदान, लंगर आदी करावयाचे झाल्यास भौतिक अंतर पुरेसे राखले जावे. मास्क असल्याशिवाय धार्मिकस्थळी कुणालाही प्रवेश देऊ नये, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com