कोरोना बाजार समिती संचालक मंडळाच्या पथ्यावर, मुदतवाढ संपेपर्यंत निवडणुका नाहीच

कृष्णा लोखंडे
Sunday, 3 January 2021

कोरोना संक्रमणामुळे जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या प्रस्तावित संचालक मंडळाच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात येऊन सहा महिने मुदतवाढ मिळाली.

अमरावती : कोरोना संक्रमणामुळे मुदतवाढ मिळालेल्या बाजार समिती संचालक मंडळास पुन्हा संधी मिळाली आहे. नव्याने दिलेली मुदतवाढ संपेपर्यंत या बाजार समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्यांना थेट सहा महिने अधिक कालावधी मिळाला आहे.

हेही वाचा - गृहिणींची चिंता वाढली! थंडीचा कडाका वाढल्याने टोमॅटो वगळता भाजीपाला वधारला

कोरोना संक्रमणामुळे जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या प्रस्तावित संचालक मंडळाच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात येऊन सहा महिने मुदतवाढ मिळाली. अमरावती, तिवसा, चांदूरबाजार बाजार समिती संचालक मंडळास एप्रिल, तर अचलपूर, दर्यापूर, चांदूररेल्वे व अंजनगावसुर्जी या बाजार समितीच्या संचालक मंडळांना मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. अमरावती बाजार समितीची मुदत 12 ऑक्‍टोबरला, अचलपूर बाजार समितीची 1 सप्टेंबर, दर्यापूरची 17 सप्टेंबरला, चांदूररेल्वेची 19 सप्टेंबरला व अंजनगावसुर्जी येथील 20 सप्टेंबर तिवसा बाजार समितीला 8 ऑक्‍टोबरला, तर चांदूरबाजार समितीची मुदत 12 ऑक्‍टोबरला संपली आहे. मात्र, मुदतवाढ मिळाल्याने संचालक मंडळांना जीवदान मिळाले.

हेही वाचा - पेट्रोल टाकून दुचाकी पेटवली; चौघांचा युवकावर प्राणघातक...

सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. बाजार समितीला मिळालेली मुदतवाढ संपेपर्यंत निवडणुका घेता येणार नसल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या संचालक मंडळांना कामकाजाची संधी मिळाली आहे. नांदगावखंडेश्‍वर व धामणगावरेल्वे बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. धामणगावरेल्वे बाजार समितीमध्ये घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे, तर नांदगावखंडेश्‍वर बाजार समितीला न्यायालयातूनही दिलासा मिळू शकला नाही. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत 18 ऑगस्ट 2020 ला संपली आहे. धारणी, मोर्शी व वरुड बाजार समितींच्या संचालक मंडळांची मुदत एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यांच्या निवडणुकाही यानंतरच घेण्यात येणार आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati apmc board of directors get time due to postpone of election