esakal | ‘रॅन्चो’ची ‘इलेक्ट्राॅनिक्स’ गरुडझेप; शून्यातून उभा केला व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

‘रॅन्चो’ची ‘इलेक्ट्राॅनिक्स’ गरुडझेप; शून्यातून उभारला व्यवसाय

‘रॅन्चो’ची ‘इलेक्ट्राॅनिक्स’ गरुडझेप; शून्यातून उभारला व्यवसाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : शिक्षणात फारशी नेत्रदीपक कामगिरी नाही. जेमतेम गुण घेऊन परीक्षा पास. घरातील परिस्थिती जेमतेम. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा पत्ता नाही, कुणाचे मार्गदर्शन नाही. एका हरहुन्नरी खऱ्याखुऱ्या ‘रॅन्चो’ने बुद्धिमत्ता तसेच जिद्दीच्या जोरावर ‘ब्लॅक टी इलेक्‍ट्रोटेक’चा भन्नाट व्यवसाय विश्‍वात प्रवेश केला आणि पाहता-पाहता शून्यातून उभा केला व्यवसाय. अमरावतीच्या महादेवनगर परिसरातील आशीष सुभाष दहेकर यांचा राष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये सेन्सरच्या माध्यमातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे पुरविण्याचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. मात्र, आज जरी या व्यवसायाची भरभराट दिसत असली तरी त्यामागील संघर्षाची गाथा मात्र निराळीच आहे. (Amravati-news-startup-Electronic-Business-Business-News-nad86)

सर्वसामान्य युवकांप्रमाणेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाचा सांभाळ करण्याइतपत कमाई व्हावी, असा आशीषचा हेतू राहिला. अमरावती येथूनच इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या आशीषने कुणाच्या दारात नोकरीसाठी जायचे नाही, असा निर्धार सुरुवातीलाच करून ठेवला होता. सुरुवातीपासूनच बॅक बेन्चर होतो. शिक्षणात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. असे असले तरी स्वप्न मात्र मोठे पाहिले. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर सेन्सर रिमोटिंग क्षेत्राला निवडले. सेन्सर तसेच रिमोटच्या साह्याने घरातील उपकरणे सुरू किंवा बंद करणे, पाण्याची टाकी भरल्यानंतर आपोआप पंप बंद होणे, कारखाना, गोदाम, ऑफिसेसमध्ये सेन्सरची अनेक उपकरणे तयार करण्यात त्याचा हातखंडा झाला.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. गावातल्या लोकांना गावातील कर्तबगार माणसाची फारशी किंमत नसते, ही उपरती आशीषलासुद्धा झाली होती. खचून न जाता त्याने ऑनलाइनचा मार्ग निवडला आणि त्याचे विश्‍वच बदलून गेले. विविध ई-कॉमर्स साइटसवर त्याने उत्पादनाची जाहिरात करण्यास सुरुवात केली. अनेकांना ऑनलाइन मार्गदर्शनसुद्धा केले. परिणामी मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबादसारख्या महानगरांमध्ये उपकरणांची मागणी चांगलीच वाढत गेली.

आज अवघ्या काही हजारांत सुरू केलेल्या व्यवसायात आशीष लाखोंचा ‘टर्नओव्हर’ करीत आहे. चमकदार शैक्षणिक कामगिरी करता आली नाही तरी जीवनात निराश होता कामा नये, मात्र जगात होत असलेले बदल हेरून आपण त्यांना कशाप्रकारे सामोरे जातो आणि मिळालेली संधी कशा पद्धतीने कॅश करतो हीच शिकवण जणू आशीष दहेकर यांनी नवोदितांना दिली आहे.

या उत्पादनांना आहे मागणी

कंपनीद्वारे सेन्सरच्या माध्यमातून घरातील किंवा ऑफिसमधील लाइट्‌स, पंखे चालू किंवा बंद होणे, पाण्याची टाकी भरल्यानंतर आपोआप बंद होणे, काही शब्द उच्चारले की लाइटस सुरू होणे, ठरावीक टायमर सेट केल्यानंतर दुपारी सुरू केलेले शोरूममधील दिवे रात्री किंवा मध्यरात्री आपोआप बंद होणे, बाथरूममधील गीझर किंवा हीटर आपोआप बंद किंवा सुरू होणे, अशी विविध उपकरणे आशीषने तयार केली आहेत. विशेष म्हणजे अनेक ग्रामपंचायतींमध्ये सेन्सरवर आधारित एलईडी बसविण्यात आले आहे.

हेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

अनेकदा नवीन व्यवसायात उतरलेले तरुण व्यवसाय सुरू करण्याआधीच टुमदार ऑफिस, इंटेरिअर्स, भपकेदार जीवनशैली या सर्व गोष्टींवर अवास्तव खर्च करतात, नंतर प्रतिसाद मिळाला नाही तर नैराश्‍य येते. त्यामुळे सुरुवातीला अगदी आवश्‍यक असेल तेवढाच खर्च करावा आणि व्यवसायातून मिळालेले पैसे पुन्हा आपल्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, तेव्हाच कुठे यश तुमच्या टप्प्यात येईल.
- आशीष दहेकर

(Amravati-news-startup-Electronic-Business-Business-News-nad86)

loading image