
वर्धा : अंगणवाडीत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देण्यासह इतर उपक्रमांची ऑनलाइन माहिती शासनाला तत्काळ पाठविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले. सध्या वाढत असलेल्या रिचार्जच्या दरामुळे तब्बल 200 रुपयांचा भुर्दंड अंगणवाडी सेविकांना सहन करावा लागत आहे.
मोबाईलची योजना अंमलात आली त्या काळापासूनच ती वादात असल्याचे दिसून आले. अनेक संघटनांचा विरोध असताना शासनाने अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याचा निर्णय घेतला. यानुसार वर्ध्यात एक हजार 281 मोबाईलचे वितरण करण्यात आले. हे मोबाईल देण्यात आले त्याच काळात त्याच्या रिचार्जसाठी 400 रुपये देण्यात आले. यातून प्रारंभी काम चालत होते. पण, गत वर्षभरापासून मोबाईल कंपन्यांनी या रिचार्जचे दर वाढविले आहे.
पूर्वी 400 रुपयांत मिळत असलेले रिचार्ज आत 599 रुपयांचे झाले. शासनाच्या आदेशानुसार काम करण्यासाठी त्यांना ऑनलाइन असणे अनिवार्य झाले आहे. यामुळे जवळून 200 रुपये अतिरिक्त देऊन त्यांना मोबाईल रिचार्ज करावा लगतो आहे. हा भुर्दंड त्यांना दर तीन महिन्यांनी बसतो. यामुळे शासनाने ही रक्कम वाढवून देण्याची त्यांची मागणी असताना याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आयटकच्या वतीने करण्यात आला आहे. या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने या मोबाइलची शवयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
1 हजार 281 मोबाईल नादुरुस्त
अंगणवाडीची माहिती ऑनलाइन देण्याकरिता सेविकांना मोबाईल देण्यात आले. देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यांच्यात वारंवार बिघाड होत आहे. त्याची दुरुस्ती करणे परवडत नाही. यामुळे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले सर्वच मोबाईल बंदावस्थेत असल्याचे आहे.
अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाजाची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी देण्यात आलेला मोबाईलही निकृष्ट दर्जाचा आहे. शिवाय मोबाईल रिचार्ज करता अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यासाठी 400 रुपये रुपये देण्यात येतात. परंतु, रिचार्जचे दर वाढल्याने हे दर आता 599 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे लवकरच आयटकच्या वतीने या मोबाईलची शवयात्रा काढू.
- दिलीप उटाणे
राज्य उपाध्यक्ष, आयटक
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.