यवतमाळचा अनिकेत काकडे ठरला डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन अवार्डचा मानकरी

दीपक फुलबांधे 
Tuesday, 20 October 2020

अनिकेतने कोविड-१९ पासून संरक्षण मिळविण्यासाठी 'सॅन-ऑटो' हे स्वयंचलित निर्जंतुकीकरण उपकरण विकसित केले असून या नाविन्यपूर्ण व लोकोपयोगी संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे

यवतमाळ : यवतमाळ येथील स्कुल ऑफ स्कॉलर्सचा दहावीतील विद्यार्थी अनिकेत प्रशांत काकडे याला केंद्र सरकारचा 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड २०२०' घोषित झाला असून यवतमाळच्या शिरपेचात अनिकेतने मानाचा तुरा खोवला आहे.

अनिकेतने कोविड-१९ पासून संरक्षण मिळविण्यासाठी 'सॅन-ऑटो' हे स्वयंचलित निर्जंतुकीकरण उपकरण विकसित केले असून या नाविन्यपूर्ण व लोकोपयोगी संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. कोविडच्या लॉकडाउन काळात सफाई कामगारांना जीव धोक्यात घालून निर्जंतुकीकरणाची कामे करावी लागत होती. अशावेळी स्वयंचलित निर्जंतुकीकरण यंत्र तयार करण्यात अनिकेतला यश आले.

अधिक माहितीसाठी - Video : हृदयाला फुटले पाझर; जेव्हा विधवा म्हणाली, ‘घरचा कर्ता पुरुष गेल्यावर जगायच कसं’

त्याने बनविलेला सनिटायझर स्प्रेअर हा मोबाईल वरून कार्यान्वित करता येतो. तसेच सार्वजनिक स्थळे व इतर ठिकाणी वापरता येतो. यात प्रत्यक्ष मनुष्यबळाचा वापर नसल्याने कोविड संसर्गाचा धोका संभवत नाही. संपूर्ण देशातून २२ राज्यातील एकूण ९ हजार नाविन्यपूर्ण प्रकल्प या स्पर्धेत सहभागी झालेले होते. 

त्यापैकी नऊ प्रकल्पांची डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन अवार्ड साठी निवड करण्यात आली. तर इतर सहा प्रकल्पांना ॲप्रिसिएशन अवॉर्ड देण्यात आले. एकूण सात मुली व आठ मुलांचा सन्मान करण्यात येणार असून यवतमाळ जिल्ह्यातून अनिकेत काकडे याने हा पुरस्काराचा बहुमान मिळविला आहे.

यापूर्वीही अनिकेतने राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेटिव्ह अवार्ड प्राप्त केले असून त्याने बाल वैज्ञानिक म्हणून नावलौकिक संपादन केला आहे. त्याने याआधी शेतकऱ्यांसाठी विषबाधा टाळण्याकरता स्वयंचलित फवारणी यंत्र तयार केले. सध्या त्याने यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला आहे. 

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

त्याचे वडील प्रशांत काकडे हे निती आयोगाच्या 'अटल इंनोव्हेशन मिशन'चे महाराष्ट्र विभागीय समन्वयक आहेत. तर आई अंबिका जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता आहे.  या यशाबद्दल अनिकेतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aniket kakde got APJ abdul kalam innovation award