विदर्भ : फडणवीस, गडकरींसारखे नेते असूनही भाजपची कामगिरी खालावली?

BJP-Devendra-Fadnavis-Nitin-Gadkari
BJP-Devendra-Fadnavis-Nitin-Gadkari

'आमचे विरोधक नजरेच्या टप्प्यात कुठेच दिसत नाहीत', या सत्ताधीशांच्या दर्पोक्तीला मतपेटीतून जसे उर्वरित महाराष्ट्राने उत्तर दिले, तसे विदर्भानेही दिले. दशकभरापासून विदर्भातील लोकसभा, विधानसभाच नव्हे; तर महापालिका आणि जिल्हा परिषदा-नगर परिषदांमध्येदेखील भाजपने सत्तेचे अनेक सोपान पादाक्रांत केलेत. त्याला रोखणारा आणि भाजपला मोठा धक्का देणारा हा निकाल आहे.

विदर्भातील 62 मतदारसंघांतील निकालावरून असे दिसते, की भाजपला अपेक्षेप्रमाणे दणदणीत यश मिळाले नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदरात अपेक्षेप्रमाणे दारुण अपयश आले नाही. कलम 370 सारख्या मुद्यांच्या गदारोळात शेतकऱ्यांची आत्महत्या, बेरोजगारी, नक्षलग्रस्त भागातील आदिवासींचे प्रश्न  किंवा कुपोषणाची समस्या हे विषय निवडणुकीत जणू नाहीतच, असे वातावरण होते. त्यामुळे युती सरकारबाबतच्या नाराजीचे प्रतिबिंब मर्यादित प्रमाणात का होईना मतपेटीत उमटले आणि भाजपला धक्का बसला. 

2014 ची लोकसभा, विधानसभा निवडणूक एकतर्फीच होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेवर ताण होता. बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी किंवा तत्सम उमेदवारांनी घडवलेले विभाजन युतीच्या फायद्याचे ठरले होते. विधानसभा निवडणुकीत अपवादात्मक जागा वगळता वंचित आघाडीला विदर्भाने फारसा थारा दिलेला नाही. बसपचीही फारशी हवा नव्हती. त्यामुळेच युतीच्या जागा घटल्या, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढली.

तटस्थपणे पाहिले तर हा कौल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूचा म्हणावा, असा नसला तरी तो बऱ्यापैकी सरकारविरोधातला आहे. गेल्या पाच वर्षांत विरोधक हे विरोधकांसारखे वागले नसले तरी सत्ताधाऱ्यांबद्दलची नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यातल्या त्यात निवडून येऊ शकणाऱ्या विरोधकांना पाठबळ देण्यावाचून जनतेपुढे पर्याय नव्हता. तोच त्यांनी निवडला. 

विदर्भात काँग्रेसला नेता नव्हता. राष्ट्रवादीलाही नव्हता. पैसा नाही, संघटनही नाही. दमदार प्रचार नाही, अशी त्यांची स्थिती. भाजपकडे फडणवीसांसारखा मातब्बर चेहरा आणि त्यांच्या साथीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसारखे सर्वार्थाने तगडे नेते होते. शिवसेनेचे 3 खासदार नुकतेच निवडलेले. तरीही युतीला 48 जागा टिकवता आल्या नाहीत. त्यातुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संख्याबळातील वाढ चांगली झाली. काँग्रेसला विदर्भाने जीवदानच दिले. विदर्भात शिवसेनेला जे काही मिळाले, ते भाजपमुळे आणि त्या-त्या उमेदवारांच्या स्थानिक ताकदीमुळे. राष्ट्रवादीबाबतीतही असेच म्हणता येते. शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीची कामगिरी उजवी आहे, हे खरे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचा दक्षिण-पश्चिम नागपूरमधून विजय निश्चिषत होता. मात्र, नाना शामकुळे, सुधाकर देशमुख यांच्यासारख्या प्रस्थापित आमदारांना जनतेने नाकारले आहे. अनिल बोंडेंसारख्या मंत्र्यांनाही लोकांनी धडा शिकवला. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून आयात केलेल्या गोपालदास अग्रवाल यांनाही गोंदियावासींनी धक्का दिलाय. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा प्रचार व नियोजन नसते तर भाजपची कामगिरी खालावली असते, असेही निकाल सांगतो. शिवाय, मोदी आम्हाला आवडत असले तरी भाजपचा म्हणून कुणालाही निवडून देणार नाही, हे मतदारांचे मतदेखील त्यातून अधोरेखित होते. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भाजपकडे नेतृत्व, संघटन आणि आर्थिक ताकद मोठी असतानादेखील काँग्रेसने फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून झेप घेण्याचा जो प्रयत्न केला व जे मर्यादित यश मिळवले, त्यामुळे काँग्रेसमध्ये प्राण संचारलेत. नागपूरसारख्या जिल्ह्यात, जिथे जिल्हा परिषद व महापालिकेची सत्ता, खासदार आणि बारापैकी 11 आमदार भाजपचे होते, तिथे काँग्रेसने चार जागा मिळवून मारलेली मुसंडी आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या उमेदवारांशी दिलेली लढत लक्षणीय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com