आशासेविकांसाठी खुशखबर! निवडणुकीची आचारसंहित संपताच मिळणार थकीत रक्कम

सुरेंद्र चापोरकर
Sunday, 15 November 2020

आर्थिक वर्ष 2020-21 च्या अंदाजपत्रकात महापालिकेतील आशा सेविकांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, गेल्या तीन महीन्यांपासून आशा सेविकांना हे वाढीव मानधन पदरात पडले नाही.

अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता आटोपल्यानंतर आशा सेविकांना वाढीव मानधनाची थकबाकी देण्याचे आश्‍वासन आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले. आयुक्तांच्या या आश्‍वासनानंतर आशा सेविकांचे आयुक्त बंगल्यावरील दिवाळी आंदोलन सीटू प्रणीत आशा सेविका व गटप्रवर्तक संघटनेने स्थगित केले.

हेही वाचा - छंद म्हणून जुळ्या बहिणी करायच्या बेकरी प्रॉडक्ट्स तयार; आयुष्याने यु-टर्न घेतल्याने...

आर्थिक वर्ष 2020-21 च्या अंदाजपत्रकात महापालिकेतील आशा सेविकांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, गेल्या तीन महीन्यांपासून आशा सेविकांना हे वाढीव मानधन पदरात पडले नाही. कोरोना संक्रमण काळात आशा सेविकांनी विशेष कार्य केल्यानंतरही त्यांचे थकीत मानधन दिले गेले नाही. त्यामुळे असंतोष निर्माण झाला. दिवाळीपूर्वी तरी थकीत रक्कम देण्यात यावी यासाठी आशा सेविका व गटप्रवर्तक संघटनेने मागणी लावून धरली. वारंवार मागणी करूनही पदरी काहीच पडत नसल्याने अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला.

हेही वाचा - Motivation Story : सुहासने लावला ‘सेफ फूड वॉश’ लिक्विडचा शोध; भाज्या होणार...

11 नोव्हेंबरला मनपा समोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. माजी महापौर विलास इंगोले, गटनेते दिनेश बूब यांनी पुढाकार घेत हा प्रश्‍न आयुक्तांसोबत चर्चेला घेतला. स्थायी समिती सभापती राधा कुरील, आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आयुक्त रोडे यांनी आशा सेविकांच्या कामाचे कौतुक करून मानधनाची थकीत रक्कम शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहीतेमुळे सध्या देता येणे अशक्‍य असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आचारसंहिता संपताच थकीत रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर आशा सेविका व गटप्रवर्तक संघटनेने आयुक्तांच्या बंगल्यावर काळी दिवाळी साजरी करण्याचे नियोजित आंदोलन स्थगित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asha worker will get due amount after election code of conduct is over