अर्थपूर्ण संबंध येतेय अंगलट; वाळूतस्कर महसूल, खाकीवरही पडताहेत भारी

Attacks on officials are happening because of a meaningful relationship
Attacks on officials are happening because of a meaningful relationship

यवतमाळ : कमी कालावधीत कोट्‌यवधींची माया गोळा करण्याचा व्यवसाय म्हणून वाळूघाटांकडे बघितले जाते. या व्यवसायांत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा झालेला शिरकाव प्रशासनासह सामान्य नागरिकांची चिंता वाढविणारा आहे. सुरुवातीला अर्थपूर्ण संबंधातून केलेली डोळेझाक आता अधिकारी व कर्मचारी वर्गाच्याच अंगलट येत आहे. राजकीय, ‘मसल-मनी पॉवर’च्या जोरावर वाळूतस्कर महसूल, खाकीवरही भारी ठरत आहेत. कालच्या घटनेने यावर शिक्कामोर्तबच केले आहे.

उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर शनिवारी रात्री वाळूतस्करांनी चाकूहल्ला केला. त्यात स्वतः नायब तहसीलदारांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे महसूल व पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. स्वतः जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी या घटनेची दखल घेऊन हल्लेखोरांना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, २४ तासांतही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. यातच सर्वकाही दडले असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात असलेल्या शेकडो वाळूघाटांची लिलावप्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ न शकल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी अवैधरीत्या वाळूउपसा करून आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. जेसीबी, ट्रेझर बोटचा वापर करून नदीपात्राला पार पोखरून काढले आहे. नदीपात्रात निर्माण झालेले खोल खोल खड्डे वाळूमाफियांची कहानीच सांगून जाते. वाळूघाटांतून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. मात्र, मागील काळात लिलाव न झाल्याने या महसुलावर शासनाला पाणी फेरावे लागले आहे.

कधीकाळी बांधकाम व्यावसायिकांचा वरचष्मा असलेल्या वाळूव्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आपला जम बसविला आहे. त्यांना राजकीय व प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याचा लोकांचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर वाळूच्या अवैध व्यवसायात अनेक राजकीय पक्षाचे पांढरपेशे नेतेदेखील गुंतलेले आहेत. एकूणच मोठी माया या व्यवसायातून निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकारी म्हणूनच याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

एखाद्या अधिकाऱ्याने कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरविल्यास राजकीय वजन वापरून अधिकाऱ्याला चूप बसविले जाते, अथवा बळाचा वापर करून रक्त सांडविण्यापर्यंत वाळूतस्करांची हिंमत वाढली आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी वाळूतस्करीत आपली दुकानदारी थाटली आहे. शासकीय कार्यालयात त्यांची ढवळाढवळ वाढली आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

यापूर्वीही जिल्ह्यात महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. उमरखेड येथील घटनेने हल्ल्याचा कळसच गाठला आहे. आगामी काळात वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे महसूल प्रशासनाचे व जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

जिल्हाभरात वाढती दादागिरी

महसूल व पोलिस प्रशासनाकडून वाळूच्या वाहनावर जप्तीसह दंडात्मक कारवाई केली जाते. तरीदेखील अवैधरीत्या होणारी वाळूतस्करीला आळा घालता आला नाही. वाळूतस्करांनी पोसलेले गुंड कारवाई टाळण्यासाठी थेट अधिकारी वर्गाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. इतकेच नव्हे, तर त्यांचा पाठलागही करतात. जिल्हाभरात वाळूतस्करांची वाढती दादागिरी प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com