सासूने हात पकडले, सासऱ्याने अंगावर रॉकेल शिंपडले, पती गळ्यावर वार करणार तोच...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

लग्नानंतर लगेच मुंबईला गेलेल्या पतीने तिला सोबत नेले नाही. त्यामुळे ती वर्षभरापासून पतीकडे तगादा लावत होती. एकेदिवशी पती बोलला अन्‌ तिच्या पायाखालची जमीनच सरकली... पतीने मुंबईला यायचे अन्‌ राहायचे असेल तर माहेरहून दहा लाख रुपये आण, असे उत्तर दिले. कारण, मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी पतीने दहा लाखांची मागणी केली होती. मात्र, पत्नीला इतकी मोठी रक्‍कम देणे शक्‍य नव्हते. 

पुसद (जि. यवतमाळ) : लग्न होऊन उणेपुरे एक वर्ष झाले... मात्र, नवविवाहिता सासरीच होती... तर पती मुंबईला... अनेकदा विचारणा केल्यानंतरही पती मुंबईला सोबत नेत नव्हता... या कारणावरून नवविवाहित पती-पत्नीत वादंग झाले... यानंतर सासूने तिचे हात पकडले... तर सासऱ्याने बिसलेरीतून अंगावर रॉकेल शिंपडले... पती गळ्यावर वार करणार तोच हाताला झटका देत नवविवाहितेने धीटपणे थेट शहर पोलिस स्टेशन गाठले... अन्‌ समोर घडला हा प्रकार... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा यवतमाळ... तालुका पुसद... परिसर मंगलमूर्तीनगर... येथील मुलगा गणेश मंदाडे याचा वर्षभरापूर्वी विवाह झाला... मोठे स्वप्न रंगवून मुलीने सासरी प्रवेश केला... मात्र, पहिल्या दिवसापासून तिच्या पदरी दु:ख मिळाले... कारण, लग्न झाल्यानंतर पती मुंबईला निघून गेला अन्‌ पत्नीला सासरीच ठेवले... आज ना उद्या पती आपल्याला मुंबईला नेईल या आशेवर ती होती...

क्लिक करा - आंबटशौकिनांच्या मागणीत प्रचंड वाढ... बंद ब्यूटी पार्लर, ढाब्यांमध्ये रंगतोय खेळ

मात्र, लग्नानंतर लगेच मुंबईला गेलेल्या पतीने तिला सोबत नेले नाही. त्यामुळे ती वर्षभरापासून पतीकडे तगादा लावत होती. एकेदिवशी पती बोलला अन्‌ तिच्या पायाखालची जमीनच सरकली... पतीने मुंबईला यायचे अन्‌ राहायचे असेल तर माहेरहून दहा लाख रुपये आण, असे उत्तर दिले. कारण, मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी पतीने दहा लाखांची मागणी केली होती. मात्र, पत्नीला इतकी मोठी रक्‍कम देणे शक्‍य नव्हते. 

विवाहितेची माहेरची स्थिती जेमतेम असल्याने पैसा आणण्याचा प्रश्‍नच येत नाही. दुसरीकडे लॉकडाउन असल्यामुळे माहेरीही जाऊ शकत नाही. त्यामुळे सासरच्या मंडळीकडून अत्याचारात वाढ झाली. लॉकडाउनच्या काळात अत्याचार होत असल्याने ती घाबरून गेली. मात्र, तरीही ती अत्याचार सहन करीत होती.

अधिक माहितीसाठी - Video : शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटला; मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांसोबत केलं असं

25 मे रोजी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी पती घरी आला होता. यामुळे सासरच्या मंडळीची हिंमत आणखी वाढली. सासरच्या मंडळींनी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. मात्र, तिने नकार दिला. मग त्यांच्यात चांगलचे वादंग झाले. यामुळे चिडलेल्या सासूने तिचे हात पकडले. तर सासऱ्याने बिसलेरीतून अंगावर रॉकेल शिंपडले. पती गळ्यावर वार करणार तोच हाताला झटका देत नवविवाहितेने धीटपणे थेट शहर पोलिस स्टेशन गाठले. तिने धीर एकवटून पोलिसांमध्ये स्त्री अत्याचाराचा भंडाफोड केला. 

पतीने दुसरीसोबत प्रेमसंबंध

पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. यानुसार पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. यावेळी पती गणेश मंदाडे याने पोलिसांना सर्व आपबिती सांगितली. मुंबई येथील एका मुलीशी प्रेम असल्याचे त्याने सांगितले. यामुळे तो पत्नीला मुंबईला नेण्यास अत्सुक नव्हता. घरच्या मंडळींना ही गोष्ट माहीत असूनही मनाविरुद्ध लग्न लावून दिले. हे सांगताना पोलिसही चकित झाले.

हेही वाचा - Video : धन्यवाद, आभार व्यक्‍त करताना त्यांना रडू कोसळत; न्यायालयानेही केले कौतुक, कोण आहेत 'ते'?

सासर-माहेरचे एकमेकांचे नातेवाईक

सासर-माहेरचे एकमकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा विवाह लावून दिला. याचा अर्थ मुलीच्या घरच्यांना मुलाच्या प्रेमसंबंधाबाबत माहित होते. तरीही त्यांनी त्यांचा विवाह कसा लावला असा प्रश्‍न निर्माण होतो, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी दिली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हे दाखल

बाहेर कोरोनाचा प्रकोप सुरू असताना पुसद येथील मंगलमूर्तीनगरात महिला अत्याचाराचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक व स्त्री अत्याचाराविरुद्ध कायद्याअंतर्गत महिलेच्या तक्रारीवरून पती गणेश विजय मंदाडे, सासरे विजय मंदाडे व सासू रुक्‍मिणी मंदाडे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to kill a married woman in Yavatmal