अरे वाह! मातृतीर्थ जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामचा किताब या गावाला; तब्बल इतक्या रुपयांचे मिळाले बक्षीस

sindkhed grampanchayat.jpg
sindkhed grampanchayat.jpg

मोताळा (जि.बुलडाणा) : तालुक्‍यातील सिंदखेड (लपाली) या गावाने कमालीचा कायापालट केला असून, त्या बळावर सिंदखेडची जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम या 40 लाखाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. स्मार्ट ग्राम योजना 2018-19 या वर्षासाठी सदर पुरस्कार घोषित झाला. जिल्हाभरातील 13 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम मधून सिंदखेडने जिल्हा स्तरावर बाजी मारली आहे. त्यामुळे मोताळा तालुक्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.

गावाने आपली वैशिष्ट्‌यपूर्ण ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने शासनाची स्मार्ट ग्राम ही संकल्पना अलीकडील काळात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. दरम्यान, सुरवातीला जिल्ह्यातील 13 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून निवड झालेल्या गावांना प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस देण्यात आले. त्यानंतर जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम साठी तेरा गावांमध्ये चुरस निर्माण झाली. 

यात सिंदखेड (मोताळा), आंधाई (चिखली), धामणगाव धाड (बुलडाणा), घिर्णी (मलकापूर), काटी (खामगाव), कुवरदेव (जळगाव जा.), सगोडा (संग्रामपूर), टाकरखेड (नांदुरा), मादणी (मेहकर), वडगाव तेजन (लोणार), सोयदेव (सिंदखेड राजा), पिंपळगाव (देऊळगाव राजा) या गावांचा समावेश होता. यात मोताळा तालुक्‍यातील सिंदखेडने बाजी मारली असून, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम विजेता सिंदखेड गावाला 40 लाखाचे बक्षीस मिळणार आहे. 

त्यामुळे सिंदखेड गावाने स्मार्ट ग्राम स्पर्धेत पूर्ण 50 लाख बक्षीस मिळवले आहे. सिंदखेड गावाने सरपंच, सदस्य, सचिव आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने यशाच्या आकाशाला गवसणी घातली आहे. यापूर्वी सिंदखेड गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय बक्षीस मिळवून राज्य पातळीवर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला होता. सिंदखेडने स्मार्ट ग्राम स्पर्धा निकषावर आधारित विकास कामे केली. 

यात पाणी पुरवठा, आर ओ स्थापना, वृक्ष लागवड, कर वसुली, शौचालय सुविधा, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, प्लास्टिक बंदी, वीज बिल नियमित भरणा, महिला व बालकल्याण खर्च, अपंग खर्च, ग्रामसभा, सामाजिक दायित्व, सौर दिवे, एलईडी वापर, बायोगॅस, गार्डन, बायोलॉजिकल गार्डन, संकेतस्थळ, सुधारित तंत्रज्ञान वापर, सॅनिटरी नॅपकिन मशिन, संगणक वापर, भूमिगत नाली, गावात दिशादर्शक फलक, संगणक उपयोग, व्यायाम शाळा, तर श्रमदानातून सीसीटी, माती नाला बांध, एलबीएस, कांटुर बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंग, गाबियान आदी कामे करण्यात आली आहे. 

तसेच संगणक आज्ञावली वापर, संगणक द्वारे सुविधा, ऑनलाइन सुविधा अशा उद्दिष्टांची पूर्तता केली. सोबतच गांडूळखत प्रकल्प, क्रीडा महोत्सव, प्रबोधनपर व्याख्याने, शेतकरी दौरे आदी उपक्रम राबविण्यात आले. सिंदखेड ग्रामपंचायत आयएसओ प्रमाणित असून ग्रामस्थ विकास कामात अग्रेसर असतात. मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मोहोड यांच्या नेतृत्वात विस्तार अधिकारी दीपक माडीवाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच विस्तार अधिकारी नारायण राऊत यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत सचिव राजेंद्र वैराळकर यांनी उद्दिष्टपूर्तीसाठी अथक मेहनत घेतली आहे. 

त्यांना ग्रामपंचायत शिपाई पद्माकर अलोणे, पवन म्हस्के, संगणक ऑपरेटर श्री. राहणे, रोजगार सेवक प्रकाश लवांडे, ग्राम परिवर्तक नीलेश कलांसे, सरपंच विमल कदम, उपसरपंच अशोक माळेकर, सदस्य ज्योती मोरे, ईश्वर लवांडे, किशोर गडाख, रेखा खराटे, सुरेखा पवार, प्रवीण जाधव, मनीषा भुसारी, ज्ञानदेव गडाख तंटामुक्ती अध्यक्ष यांनी मोलाचे सहकार्य केले. सिंदखेड गावाच्या यशस्वी वाटचालीत गणेशसिंग राजपूत, भोजराज पाटील, जि.प. सदस्य निरंजन वाढे, पं.स. सदस्य सरस्वती भोरे, सभापती कैलास गवई, सिंदखेड आरोग्य विभाग, अंगणवाडी विभाग, शिक्षण विभाग, महिला बचत गट, ग्राम परिवर्तक नीलेश कळंसे यांनी सहकार्य केले. तर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सिंदखेड ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले आहे.

सर्वांची साथ ठरली मोलाची
सिंदखेड प्रजा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., अतिरिक्त सीईओ राजेंद्र लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, कार्यकारी अभियंता परदेशी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सोबतच लोकसहभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन यामुळे सिंदखेड गावाला यशाचे शिखर गाठता आले आहे.

...तर सिंदखेडला प्रथम पुरस्कार मिळवणे हेच ध्येय
सिंदखेड गावाचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात झळकावे, यासाठी प्रयत्नशील आहे. एकच ध्यास गावाचा विकास हा संकल्प करून काम करीत आहोत. यापूर्वी वॉटर कपच्या माध्यमातून सिंदखेडने राज्यातून द्वितीय पारितोषिक मिळवले आहे. येणाऱ्या काळात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन सिंदखेडला प्रथम पुरस्कार मिळवणे हेच ध्येय असेल.
- विमल कदम, सरपंच, स्मार्ट ग्राम सिंदखेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com