दुर्गम गावांमध्ये मुक्तिपथ करतेय जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडॉऊन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित व्यक्ती एखाद्याच्या संपर्कात आल्यास त्याला संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. सुरक्षित अंतर ठेवून अत्यावश्‍यक कामे वगळता लोकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचना, त्याचबरोबर लोकांनी कोणत्या कृती कराव्या, याविषयी भामरागड आणि एटापल्ली तालुक्‍यातील दुर्गम गावांमध्ये मुक्तिपथच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

गडचिरोली : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुक्तिपथद्वारे भामरागड आणि एटापल्ली येथील दुर्गम गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. हा आजार टाळण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना ध्वनीमुद्रित संदेशाच्या माध्यमातून सांगण्यात आल्या. मुक्तिपथ तालुका चमूने याचे नियोजन केले.

अवश्य वाचा - लॉकडाउनमुळे ‘मंगल’कार्याला लागले टाळे!

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडॉऊन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित व्यक्ती एखाद्याच्या संपर्कात आल्यास त्याला संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. सुरक्षित अंतर ठेवून अत्यावश्‍यक कामे वगळता लोकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचना, त्याचबरोबर लोकांनी कोणत्या कृती कराव्या, याविषयी भामरागड आणि एटापल्ली तालुक्‍यातील दुर्गम गावांमध्ये मुक्तिपथच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. मुक्तिपथद्वारे निर्मित एका ध्वनीमुद्रित संदेशाद्वारे लोकांनी घरातच थांबणे का आवश्‍यक आहे, कोरोना संसर्ग कसा पसरतो आणि तो पसरू नये, यासाठी प्रत्येकाने काय काळजी घ्यावी, याविषयी माहिती देण्यात आली. हा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने सातत्याने स्वच्छ हात धुणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर सर्दी-खोकल्याचा त्रास असल्यास मास्क किंवा रुमाल बांधून खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. भामरागड येथे तहसील कार्यालयातून जनजागृतीला सुरुवात झाली. शहरातील संपूर्ण वॉर्ड त्याचबरोबर लाहेरी, मल्लमपोद्दूर, कुक्कामेटा, हिंदेवाडा, धोडराज, राणीपोद्दूर, मेडपल्ली, हिनभट्टी, दुब्बागुडा, ताडगाव, धुलेपल्ली, कुमरगुडा, हेमलकसा, कोयनगुडा, आरेवाडा या गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. एटापल्ली शहरात 17 वॉर्डांमध्ये, सोबतच तालुक्‍यातील तोडसा, मवेली, देवदा, कसनसूर, रोपी, कसुरवाही, कांदळी, जारावंडी, बुर्गी, उडेरा, तुमरगुंडा, पंदेवाही या गावांमध्ये कोरोना संसर्ग रोखण्याविषयी जनजागृती करण्यात आली.

पानठेले बंद ठेवण्याचे आवाहन

कोरोना संसर्ग पसरू नये, यासाठी राज्य शासनाद्वारे खर्रा, सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारी यांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षाकरिता प्रतिबंध लावण्यात आला आहे. पानठेलाधारकांनी आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांना सतत थुंकण्याची सवय असते आणि ते फार धोक्‍याचे आहे. त्यामुळे पानठेला नको, खर्रा नको, कोरोना नको, असा संदेश देतानाच घरपोच खर्रा मागवू नका, असे आवाहनही मुक्तिपथच्या माध्यमातून केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness is spreading to remote villages