पळस फुलताच दिसू लागल्या परदेशी पळस मैना; पूर्व युरोप, पश्‍चिम आणि मध्य आशियातून येतात महाराष्ट्रात

मिलिंद उमरे 
Friday, 19 February 2021

हिवाळ्याच्या काळात पूर्व युरोप आणि पश्‍चिम व मध्य आशियातून महाराष्ट्रात स्थलांतर करणाऱ्या पळस मैना पक्ष्यांचे मोठ मोठे थवे दिसू लागले आहेत. कडक थंडीपासून बचाव करण्यासाठी पळस मैना पूर्व युरोप आणि पश्‍चिम व मध्य आशियातून हिवाळ्यात स्थलांतर करून जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतात येतात.

गडचिरोली : गुलाबी झाक असलेल्या आणि काळा अंगरखा घातल्यासारख्या दिसणाऱ्या सडपातळ बांध्याच्या परदेशी पळस मैना आपल्या परीसरात पळस फुलल्याबरोबर दिसू लागल्या आहेत. दरवर्षी पळसाशी आपले प्राचीन नाते सांगत पूर्व युरोप, पश्‍चिम, मध्य आशियातून या मैना महाराष्ट्रात येतात. यंदाही अनेक ठिकाणी या पळस मैना दिसू लागल्या आहेत.

हिवाळ्याच्या काळात पूर्व युरोप आणि पश्‍चिम व मध्य आशियातून महाराष्ट्रात स्थलांतर करणाऱ्या पळस मैना पक्ष्यांचे मोठ मोठे थवे दिसू लागले आहेत. कडक थंडीपासून बचाव करण्यासाठी पळस मैना पूर्व युरोप आणि पश्‍चिम व मध्य आशियातून हिवाळ्यात स्थलांतर करून जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतात येतात. 'भोरडी' या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या पक्षाला इंग्रजीत 'रोजी स्टारलिंग' असे नाव आहे. भारतातील वातावरण या पक्ष्यांसाठी पोषक असते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे पक्षी भारतात राहतात. 

हेही वाचा - Breaking : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना...

शेताचे मोकळे रान, तलावांजवळ तसेच निमवाळवंटी प्रदेश हे त्याच्या वास्तव्याचे आवडीचे ठिकाण असते. शेतातील टोळ, नाकतोडे, अळ्या असे शेतीस हानिकारक कीटक त्यांचे आवडीचे अन्न असल्याने हा पक्षी शेतकऱ्यांचा मित्रच समजला जातो. हा पक्षी आपल्या भागात साधारणत: पळसाला फुले आल्यानंतर दिसतो त्यामुळे त्याला पळस मैना म्हटले जाते. पण, पळसातील फुलांचा मधुरस पिण्यासोबत विविध प्रकारचे कीटक, वड-पिंपळ, अशा वृक्षांच्या बिया, सावरीच्या फुलांतला मधही आवडीने या मैना आवडीने प्राशन करतात. आपल्या विष्ठेतून बीजप्रसार करून दूरदूरपर्यंत वृक्षारोपणासही त्या मदत करतात.  

हे पक्षी हजारोंच्या संख्येने प्रवास करत असल्याने त्यांचे प्रचंड मोठे थवे दिसतात. कधी कधी त्यांच्या विशिष्ट लयीतील उड्डाणे, कसरती यामुळे एखादा छोटा ढग आकाशातून जातोय, असाही भास होतो. स्थलांतराचे कोडे वैज्ञानिकांना अजूनही पूर्ण सुटलेले नाही. हा पक्षीसुद्धा नेमका पळस फुलण्याच्या काळातच कसा हजर होतो, हेही एक कोडेच आहे. 

हेही वाचा - संविधान न वाचणारे राज्यपालांच्या पत्रावर टीका करतात,...

कधी मैत्री, कधी दादागिरी...

या पळस मैना अनेकदा सामान्य मैना, कवडी मैना, ब्राह्मणी मैना या स्थानिक मैनांसोबतही मैत्री करत त्यांच्यासोबत बसलेल्या किंवा खाद्यंती करताना दिसून येतात. पण, मोठ्या संख्येने असल्याने कधी कधी दादागिरीही करतात. पळस, सावरीच्या फुलांवर हक्‍क सांगत इतर पक्ष्यांशी भांडून त्यांना तिथून घालवून देतानाही दिसतात. यांना पळस मैना, गुलाबी मैना, भोरडी आणि मधुसारिका अशी नावे आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beautiful Rosy starling birds are coming in Maharashtra Gadchiroli