नागरिकांनो सावधान! लग्नसमारंभात दागिन्यांकडे ठेवा लक्ष; चोरांची असू शकते नजर 

दीपक फुलबांधे 
Friday, 4 December 2020

सरकारने लॉककडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बाजारपेठा व बॅंकांमध्ये गर्दी वाढायला लागली आहे. हळूहळू अर्थव्यवस्था रुळावर येत असताना चोरटे देखील सक्रिय झाले आहेत.

लाखनी (जि. भंडारा) : शहरात अचानक चोरटे सक्रिय झाले आहेत. भरदिवसा बॅंक, एटीएम तसेच लग्नसमारंभात चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारने लॉककडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बाजारपेठा व बॅंकांमध्ये गर्दी वाढायला लागली आहे. हळूहळू अर्थव्यवस्था रुळावर येत असताना चोरटे देखील सक्रिय झाले आहेत. लॉककडाउनमुळे रखडलेले लग्नसमारंभ आटोपण्याकडे नागरिकांचा कल आहे. अशात लाखनीवासींसमोर चोरट्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत असल्याने शहरात पोलिसांचा धाक नाही का? असा प्रश्न आहे.

क्लिक करा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी भरदिवसा सात लाखांची रोकड लंपास केली होती. यापूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेत लोकेश जनरल स्टोअर्सच्या नोकराच्या हातून दोन लाख रुपये उडविले होते. अलीकडे एका एटीएममधून 80 हजारांची रोकड लंपास करण्यात आली. 15 दिवसांपूर्वी गडेगाव येथे रहांगडाले यांच्या घरासमोरील दार तोडून 90 हजाराची रक्कम चोरून नेली. यासोबतच लाखनी तहसील कार्यालयातून तीन मोटरसायकल चोरी गेल्या आहेत.

सोमवारी देखील शहरातील एका ख्यातनाम मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्नसमारंभातून अनोखळी व्यक्तीने वधूच्या मावशीची दागिने ठेवलेली बॅग चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली तरी, देखील पोलिसांना चोरटे गवसले नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मास्कमुळे होतोय घोळ

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने सार्वजनिक ठिकाणी सर्वजण मास्कचा वापर करतात. यामुळे व्यक्तीची ओळख पटत नाही. त्यामुळे चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली तरी, देखील चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांना अवघड ठरत आहे.

 जाणून घ्या - नागपुर पदवीधर निवडणूक: पराभव नक्की कोणाचा? भाजपचा की संदीप जोशींचा?

नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी वावरताना तसेच बॅंक व एटीएमधून येताना नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. अशा ठिकाणी चोरटे सक्रिय असून त्यांची पाळत राहण्याची शक्‍यता आहे. विशेषतः महिलांनी आपल्या दागिन्यांची काळजी घेणे अधिक आवशयक झाले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beaware from thieves while going to crowded place